Chiplun News: ‘SBI Yono’ ॲपच्या नावाखाली चिपळूणात ८६ वर्षीय ज्येष्ठाची ५.२६ लाखांची ऑनलाईन फसवणूक

खात्याची माहिती मिळवून मोबाईल केला हॅक; अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण : Chiplun News अंतर्गत चिपळूण शहरात ऑनलाईन सायबर फसवणुकीची एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील महालक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या एका ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ‘एसबीआय योनो’ (SBI Yono) ॲपच्या नावाखाली जाळ्यात ओढून अज्ञात भामट्याने तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.

बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून मिळवली माहिती

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कविश्वर कृष्णाजी बापट (वय ८६, रा. योगायोग निवास, महालक्ष्मी नगर, लाड सभागृहासमोर, खेंड-चिपळूण) यांनी याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ७ मार्च रोजी सकाळी ११ ते ८ मार्च दुपारी १२ या कालावधीत हा प्रकार घडला. बापट हे घरी असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण ‘एसबीआय योनो’ ॲपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

सर्व्हिस अकाउंटची माहिती विचारून मोबाईल केला हॅक

संशयिताने बापट यांच्या सर्व्हिस अकाउंटची (Service Account) गोपनीय माहिती विचारून घेतली. ही माहिती मिळताच आरोपीने त्यांचा मोबाईल हॅक केला. मोबाईलचा आणि खात्यातील उपलब्ध माहितीचा गैरवापर करून भामट्याने बापट यांच्या बँक खात्यातून एकूण ५,२६,२७९ रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून लंपास केले.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल

याबाबत कविश्वर बापट यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT Act) अधिनियमातील कलम ६६(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर ऑनलाईन फसवणुकीचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 14-08-2026