Ratnagiri Crime News: मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; तीन संशयितांना पोलिसांकडून अटक

दारूच्या नशेत लोखंडी जिन्यावर चढून फोटो काढण्याचा प्रकार; नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या स्वाधीन

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): Ratnagiri Crime News अंतर्गत रत्नागिरी शहरातील अत्यंत गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची दारूच्या नशेत विटंबना केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयित तरुणांना अटक केली आहे. १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. साजन फर्जान शेख (वय २६), समीर शेख (वय २६) आणि करीम शेख (वय २३, तिघेही मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

दारूच्या नशेत पुतळ्यावर हात ठेवून काढत होते फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हे तिघे संशयित मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावलेल्या लोखंडी जिन्यावर चढले. दारूच्या पूर्ण नशेत असलेल्या या तरुणांनी अश्वारूढ पुतळ्यावर हात ठेवून फोटो काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार तेथून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तिघांना हटकले व जाब विचारला.

एकाचा पळून जाण्याचा प्रयत्न; नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन

नागरिकांनी जाब विचारताच करीम शेख याने भीतीपोटी तेथून पळ काढला, मात्र साजन शेख व समीर शेख यांना नागरिकांनी प्रसंगावधान राखून जागीच पकडून ठेवले. घटनेची माहिती तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

मारुती मंदिर परिसरात बंदोबस्त; तिसऱ्या आरोपीला कामाच्या ठिकाणाहून ठोकल्या बेड्या

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मारुती मंदिर परिसरात तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान साजन आणि समीर यांनी पळून गेलेल्या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पोलिसांनी कोकणनगर येथील त्याच्या कामाच्या ठिकाणी धाड टाकून करीम शेखला देखील अटक केली.

हिंदू संघटनांची तक्रार; न्यायालयासमोर हजर

या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून, पुतळ्याची विटंबना नेमकी कोणत्या हेतूने करण्यात आली आणि त्यामागे काही कट होता का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 14-08-2026