रत्नागिरी: “कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट”; ‘उबाठा’चा तीव्र आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी: कोकणचा राजा असलेल्या हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच, दुसरीकडे कॅनिंग कंपन्यांनी (प्रक्रिया उद्योग) आंब्याचे दर अचानक ५० टक्क्यांनी कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कंपन्यांनी आंबा दर स्थिर न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हंगामाच्या ऐन भरात दर पाडले; बागायतदार संकटात

रत्नागिरीतील कॅनिंग कंपन्यांमध्ये प्रक्रियेसाठी (पल्प आणि इतर उत्पादने) जाणारा आंबा सध्या मातीमोल भावाने खरेदी केला जात असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. आंबा हंगामाच्या ऐन भरात कंपन्यांनी अचानक दर अर्ध्यावर आणल्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

“परराज्यातील आंबा जिल्ह्यात येणे कायमचे बंद करू” – बाळ माने

या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी कॅनिंग कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “रत्नागिरीतील कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील आंबा येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या दर्जेदार हापूसला डावलून बाहेरच्या आंब्याला प्राधान्य दिले जात असल्यामुळेच येथील बाजारपेठ कोसळली आहे. जर स्थानिक शेतकऱ्यांच्या घामाचे योग्य दाम मिळाले नाही, तर हा बाहेरचा आंबा रत्नागिरी जिल्ह्यात येणे आम्ही कायमचे बंद करू.”


शेतकरी रस्त्यावर उतरणार: मयुरेश्वर पाटील

रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी कंपन्यांच्या या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला. “येत्या काही दिवसांत कॅनिंग कंपन्यांनी आपले धोरण सुधारले नाही आणि आंबा खरेदीचे दर वाढवून ते स्थिर ठेवले नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेना बागायतदारांच्या पाठीशी

आंबा शेतकरी व व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश (बाबा) साळवी यांनीही बागायतदारांच्या या लढ्यात शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच हैराण झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना आता या व्यापारी मंदीचा सामना करावा लागत असल्याने, शासन आणि प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 05-05-2026