Ramdas Athawale: “मी भाजपसोबत नाही, भाजप माझ्यासोबत” – रामदास आठवले

पुणे: “दलित समाजाची ताकद खूप मोठी आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे, हे माझ्या हातात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आले, म्हणून मी काँग्रेसची साथ सोडून भाजपकडे गेलो आणि देशात भाजपाची सत्ता आली. त्यामुळे मी भाजपसोबत गेलेला नाही, तर भाजप माझ्यासोबत आहे, असे मी मानतो,” असे रोखठोक मत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

‘भारताची भीमज्योत’ कार्यक्रमात फटकेबाजी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पुण्यातील समता भूमी येथे ‘भारताची भीमज्योत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना रामदास आठवले यांनी नेहमीच्या शैलीत राजकीय टोलेबाजी केली.

या प्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.

“संविधान कोणीही बदलू शकत नाही, काँग्रेसकडून केवळ वावड्या”

विरोधी पक्षांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या संविधान बदलाच्या आरोपांचा समाचार घेताना आठवले म्हणाले, “भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगीकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारे मजबूत संविधान देशाला दिले आहे. हे संविधान देशात कोणीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी तशा वावड्या उठवत आहेत.”


“मी ज्यांच्यासोबत, त्यांचीच सत्ता!”

आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी स्वतःला सत्तेचा ‘लकी चार्म’ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

“माझा इतिहास साक्षी आहे, मी ज्यांच्यासोबत असतो त्यांची सत्ता आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत मी भाजपसोबत (महायुती) आहे, तोवर देशात भाजपाचीच सत्ता येणार आहे. आगामी काळात मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी नक्की मिळणार आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसाच विरोध मलाही केला होता, अशी आठवण सांगत त्यांनी काँग्रेसच्या जुन्या धोरणांवर कडाडून टीका केली. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला रिपाइं आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 05-05-2026