Ranbhaji Mahotsav Ratnagiri: रत्नागिरीत आज जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव

माळनाका येथील विवेक हॉटेलमध्ये भरणार प्रदर्शन; पाककला स्पर्धा आणि ऑनलाईन रील स्पर्धेतील विजेत्यांचा होणार सत्कार

रत्नागिरी : Ranbhaji Mahotsav Ratnagiri अंतर्गत शहरी नागरिकांना दुर्मीळ रानभाज्या व पौष्टिक तृणधान्यांची ओळख व्हावी, तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट बाजारपेठ मिळावी, या मुख्य उद्देशाने रत्नागिरीत जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी माळनाका येथील विवेक हॉटेलमध्ये पार पडणार सोहळा

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा (ATMA) प्रकल्प संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवारी, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत माळनाका येथील विवेक हॉटेल (देसाई बँक्वेट हॉल) येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री, विविध लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची संधी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध रानभाज्या, पौष्टिक तृणधान्ये (नाचणी, वरी, बाजरी, ज्वारी, राळा, कोदू, कुटकी आदी), प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची नामी संधी मिळणार आहे. तसेच नामांकित कृषी शास्त्रज्ञ व आरोग्य तज्ज्ञांमार्फत रानभाज्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे आणि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

पाककला स्पर्धा आणि ऑनलाईन रील स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

महोत्सवादरम्यान रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य पाककला अशा दोन स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, तृणधान्य पाककृती स्पर्धेसाठी पहिल्या ३० तर रानभाजी स्पर्धेसाठी पहिल्या ४० स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी हर्षला पाटील (९४२२४४१५७१), नेहा पवार (९४२३२०३६४१) किंवा गौरी शेट्ये (९४०३१४४५६१) यांच्याशी संपर्क साधावा.

याशिवाय रानभाज्यांचे महत्त्व तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी ४ ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजित ऑनलाईन रील स्पर्धेतील ३ उत्कृष्ट विजेत्यांना या मुख्य कार्यक्रमात बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे.

कोकणातील निसर्गसिद्ध, रासायनिक खतांशिवाय उगवणाऱ्या रानभाज्या आणि तृणधान्ये अत्यंत पौष्टिक व औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला बचत गट आणि गृहिणींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि आत्मा कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 14-08-2026