पुणे:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार असला तरी, बोर्डाकडून आताच पत्रकार परिषदेत निकालाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात २ टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
कोकण विभागाची सुवर्णकामगिरी; छत्रपती संभाजीनगरला धक्का
विभागीय निकालाचा विचार केल्यास, यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के इतका लागला आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाला निकालात मोठा फटका बसला असून, या विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी, म्हणजेच ८८.४१ टक्के इतका लागला आहे.
निकालात मुलींचेच वर्चस्व
यंदाच्या दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्यातील ९४.९६ टक्के मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या तुलनेत मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. त्यामुळे अभ्यासात मुलीच आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दहावी निकालाची सविस्तर आकडेवारी एका दृष्टिक्षेपात
नियमित विद्यार्थी: परीक्षेसाठी एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.
एकूण नोंदणी: सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास, परीक्षेत एकूण १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी (९०.७५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
फॉर्म नंबर १७ (खासगी विद्यार्थी): खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून २८ हजार ०२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २२ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ टक्के आहे.
रिपीटर विद्यार्थी: पुनर्परीक्षार्थी (Repeater) म्हणून २८ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी पास झाले असून, त्यांचा निकाल ३३.८९ टक्के इतका लागला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 08-05-2026














