नवी दिल्ली: देशातील जनतेला इंधन बचत आणि स्वदेशीचा मंत्र देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आता स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत ताफ्यातील (Convoy) वाहनांची संख्या चक्क ५० टक्क्यांनी कमी केली आहे. वडोदरा आणि गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात प्रकर्षाने दिसून आली.
सुरक्षेशी तडजोड नाही, पण खर्चात कपात!
पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ला (SPG) स्पष्ट आदेश दिले आहेत की, ताफ्यातील वाहनांची संख्या निम्मी करावी. विशेष म्हणजे, ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मात्र, यासाठी नवीन गाड्यांची खरेदी न करता उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. गुवाहाटी येथे हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यातील हा बदल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
इंधन आणि पैशांच्या बचतीसाठी ७ कलमी ‘मोदी मंत्र’
हैदराबाद येथील सभेत आणि इतर व्यासपीठांवरून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संकटकाळात संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जनतेला खालील ७ गोष्टी पाळण्याचे आवाहन केले:
१. इंधनाचा वापर टाळा: पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करा. २. सार्वजनिक वाहतूक: मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा. ३. कारपूलिंग: एकाच गाडीतून जास्तीत जास्त लोकांनी प्रवास करण्यावर भर द्या. ४. सोन्याची खरेदी टाळा: सोन्याच्या आयातीमुळे देशाचा मोठा पैसा परदेशात जातो, त्यामुळे सध्या सोने खरेदी टाळावी. ५. वर्क फ्रॉम होम (WFH): सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी ऑनलाइन बैठका आणि ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य द्यावे. ६. स्वदेशीचा वापर: परदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्या. ७. खाद्यतेल आणि शेती: खाद्यतेलाचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांना दिला कृती आराखडा (Plan)
गुवाहाटी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांच्या भाषणाची प्रत आणि एक विशेष ‘अॅक्शन प्लॅन’ सोपवला आहे. यामध्ये संकटकाळात प्रशासकीय खर्च कसा कमी करावा आणि इंधनाची बचत कशी करावी, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
व्हर्च्युअल मीटिंगवर भर
पंतप्रधानांनी स्वतः जास्तीत जास्त बैठका ऑनलाइन (Virtual Meetings) घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचत असून, इतर नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनीही याचे अनुकरण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. ‘देश प्रथम’ या भावनेतून नागरिकांनी या आवाहनांना प्रतिसाद द्यावा, अशी विनंती पंतप्रधान मोदींनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 13-05-2026














