नवी दिल्ली: देशभरात उन्हाचा कडाका वाढत असतानाच हवामान विभागाने (IMD) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) येत्या तीन दिवसांत म्हणजेच १६ मेपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होणार आहेत. मान्सूनच्या या वेगवान हालचालींमुळे यंदा पाऊस वेळेपूर्वीच बरसणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
अंदमानात वेळेपूर्वीच एन्ट्री
साधारणपणे मान्सून १८ ते २० मे दरम्यान अंदमान बेटांवर पोहोचतो. मात्र, यंदा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि अंदमान समुद्रामध्ये तो लवकर सक्रिय होत आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, १६ मेपर्यंत अंदमानच्या बहुतांश भागात मान्सूनचे वारे स्थिर होतील. अंदमानात लवकर आगमन झाल्यामुळे केरळमध्येही मान्सून नियोजित वेळेच्या (१ जून) आधी धडकण्याची आशा निर्माण झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, बुधवारी त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. या हवामान बदलाच्या प्रभावामुळेच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण मिळाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार दिवस दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह ईशान्य भारतात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एल निनोचा प्रभाव आणि पावसाचे वेळापत्रक
यावर्षीच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीचा वेग पाहता महाराष्ट्रातील पावसाचे अंदाजित वेळापत्रक खालीलप्रमाणे असू शकते:
- केरळ: ३० मेच्या आसपास.
- तळकोकण: ५ जूनच्या सुमारास.
- पुणे-मुंबई: ५ ते १० जून दरम्यान.
राज्यात उष्णतेची लाट कायम
मान्सूनचे वारे जरी अंदमानच्या दिशेने सरकत असले, तरी सध्या महाराष्ट्रासह उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यातील तापमानाचा पारा चढाच असल्याने नागरिकांना घामाच्या धारा सोसाव्या लागत आहेत. अशा स्थितीत पावसाच्या आगमनाची ही बातमी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.














