पुणे/मुंबई:
देशभरातील बळीराजा आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या नैऋत्य मान्सूनबाबत (Monsoon 2026) भारतीय हवामान खात्याने (IMD) एक मोठी आणि दिलासादायक अपडेट दिली आहे. मान्सूनने अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अंदमान बेटांच्या श्रीविजय पुरमसह अरबी समुद्राच्या आग्नेय भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागांत दिमाखात आगमन केले आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील ३-४ दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत मान्सून अंदमान बेटे, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये वेगाने दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामागे ‘एल निनो’मुळे (El Nino) निर्माण झालेली स्थिती हे एक मुख्य कारण असू शकते, असे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनची एन्ट्री? (कोकणात ‘या’ दिवशी पाऊस शक्य)
महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने खालील महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे:
- केरळमध्ये आगमन: मान्सून २६ मे ते ३१ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे.
- महाराष्ट्राच्या सीमेवर: केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण एका आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडकतो.
- कोकणात आगमन: या अंदाजानुसार, ६ जूनच्या आसपास मान्सून कोकणात दाखल होऊ शकतो. त्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रात पुढे सरकेल.
सध्या महाराष्ट्रात हवामानामध्ये वेगाने पोषक बदल होत आहेत. त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच किंवा अगदी वेळेवर महाराष्ट्रात दाखल होईल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-05-2026













