Pune Visapur Landslide: मावळमध्ये ‘माळीण’ची पुनरावृत्ती, भूस्खलनात कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं

मावळ (पुणे): Pune Maval Landslide मुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक विसापूर किल्ल्याचा (Visapur Fort) एक मोठा भाग कोसळल्याने पायथ्याशी असलेल्या पाटण गावातील एका घरावेर दरड कोसळली. आज ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत स्थानिक नागरिक नंदू तिकोने यांचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या घरात नंदू तिकोने, त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या सदस्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाचा मृतदेह हाती लागला असून, ढिगारा उपसण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

एनडीआरएफ (NDRF) कडून तातडीने मदतकार्य सुरू

पुण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची वाच्यता होताच मावळचे तहसीलदार तात्काळ यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागवण्यात आली.

सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली आणि निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफचे ३० सदस्यांचे (१ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवान) विशेष पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या ढिगारा हटवून नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

‘पाच मिनिटांत स्फोटासारखा आवाज झाला अन् घर गायब झाले’ – प्रत्यक्षदर्शी

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या पाटण गावातील या दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले यांनी अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. अक्षय यांनी सांगितले की, “पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मी तिकोणेंचे घर पाहिले होते, ते सुरक्षित होते. मात्र, त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच डोंगरावरून मोठा स्फोटासारखा आवाज झाला आणि तिकोणेंचे घर डोळ्यादेखत मातीच्या ढिगाऱ्याखाली गायब झाले.”

दुसरे शेजारी पंकज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकोणेंच्या घरात रात्री पंधरा सदस्य उपस्थित होते. पहाटे हा प्रसंग घडल्यामुळे संपूर्ण गावामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, आता या भागात राहण्याची इच्छा उरली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप; लोणावळ्यात ६७० मिमी पाऊस

गेल्या काही तासांपासून पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. लोणावळ्यात आज सकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ६७० मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळेच विसापूर किल्ल्याची दरड कोसळल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील इतर भागांतील २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे:

  • लोणावळा: ६७० मिमी
  • भिरा: ६०९ मिमी
  • ताम्हिणी घाट: ५८० मिमी
  • शिरगाव (मावळ): ५४० मिमी
  • आंबोश्या (लोणावळा-लवासा दरम्यान): ५३७ मिमी
  • खोपोली: ५१६ मिमी

या प्रचंड पावसामुळे डोंगराळ भागांमधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 06-07-2026