लांजा तालुक्यात धक्कादायक प्रकार; घरगुती चर्चेवरून गैरसमज, ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून माय-लेकीला मारहाण!

लांजा (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात चाललेल्या साध्या कौटुंबिक चर्चेवरून एका उच्चशिक्षित दाम्पत्याने गैरसमज करून घेत एका ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध महिला आणि त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी व हाताच्या थापटांनी बेदम मारहाण करत त्यांच्या नातीचाही अत्यंत घाणेरड्या शब्दांत अपमान केला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे २०२६ रोजी सायंकाळी १६:१५ वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक (ता. लांजा) येथे घडली.

यातील फिर्यादी दीपाली दीपक डोळस (वय ६७ वर्षे, व्यवसाय-गृहिणी) आणि त्यांची मुलगी रूपाली दीपक डोळस या आपल्या घरात बसून आपापसात काहीतरी बोलत होत्या. त्याच वेळी तिथे राहणारा आरोपी विशाल मारुती डोळस याने “तुम्ही माझ्याबद्दल काय बोलत आहात?” असा नाहक गैरसमज करून घेतला. या रागातून त्याने थेट दीपाली डोळस यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश (गृह-अतिक्रमण) केला.


माय-लेकीला मारहाण आणि नातीचा घाणेरड्या शब्दांत अपमान

घरात घुसल्यानंतर आरोपी विशाल याने काहीही न ऐकता वृद्ध फिर्यादी दीपाली आणि त्यांची मुलगी रूपाली यांच्या कानाखाली हाताच्या थापटा मारण्यास सुरुवात केली. तसेच दोघींचे केस आणि अंगावरील गाऊन ओढून त्यांना अमानुषपणे मारहाण केली.

हा वाद सुरू असतानाच विशालची पत्नी म्हणजेच आरोपी क्रमांक २ गौरी विशाल डोळस ही फिर्यादीच्या घराच्या अंगणात आली. तिने फिर्यादी यांची नात (अनया नारकर) हिला उद्देशून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन “हिचा बाप कोण?” असे अपशब्द वापरले. तसेच “तू पैसे कमवतेस, तुम्ही भांडी घासणारी लोक आहात, तुमच्या बापाचे काय आहे?” अशा अतिशय अपमानकारक आणि घाणेरड्या भाषेत कुटुंबाचा मानसिक छळ केला.


“गेल्या वर्षभरापासून त्रास, कुटुंबाच्या जीवाला धोका!”

फिर्यादी दीपाली डोळस यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींकडून असा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार मागील वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. या नाहक त्रासामुळे संपूर्ण कुटुंबाचे गावात जगणे कठीण झाले आहे. आरोपी विशाल डोळस याच्या गुंडप्रवृत्तीमुळे फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अखेर या छळाला कंटाळून त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेतली.


शिक्षित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

विशेष म्हणजे मारहाण करणारा मुख्य आरोपी विशाल डोळस हा बीएससी (B.Sc) पदवीधर असून नोकरी करतो, तर त्याची पत्नी गौरी डोळस ही पेशाने शिक्षिका आहे. सुशिक्षित असूनही त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. १५ मे २०२६ रोजी रात्री २३:२८ वाजता लांजा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

  • गुन्हा रजिस्टर नंबर: १०३/२०२६
  • भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ ची कलमे: ११५(२) [स्वेच्छेने दुखापत करणे], ३३२(ग) [अपराध करण्याच्या उद्देशाने गृह-अतिक्रमण], ३५२ [शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान], ३५१(२) [गुन्हेगारी धमकी] आणि ३(५) प्रमाणे.