मुंबई: कोकणच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला अत्यंत गती देणारी एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड आज मुंबईत घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि देशातील आघाडीच्या दिग्गज कंपन्यांमध्ये तब्बल ६,५०० मेगावॅटहून अधिक क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले.
या ऐतिहासिक करारांतर्गत एकट्या कोकणात (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा) ४ लाख ५० हजार कोटी रुपयांची अभूतपूर्व गुंतवणूक होणार असून, तब्बल १ लाख २० हजारहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ उद्दिष्टपूर्तीसाठी आणि महाराष्ट्राला ऊर्जा संपन्न बनवण्यासाठी हे प्रकल्प मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्हा: बारसू आणि पूर्णगड येथे होणार ऊर्जा क्रांती
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१) बारसू (जि. रत्नागिरी) येथे ६००० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प
अदानी पॉवर लिमिटेड (Adani Power Limited) व त्यांची उपकंपनी कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील बारसू येथे भव्य अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- प्रस्तावित स्थापित क्षमता: ६,००० मेगावॅट (MW)
- प्रस्तावित गुंतवणूक: ₹१,५०,००० कोटी (१.५ लाख कोटी)
- रोजगार संधी: ४,५०० प्रत्यक्ष + ७,५०० अप्रत्यक्ष = एकूण १२,००० रोजगार.
२) पूर्णगड (जि. रत्नागिरी) येथे रिलायन्सचा ‘स्मॉल रिॲक्टर’ प्रकल्प
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd.) पूर्णगड येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘भारत स्मॉल रिॲक्टर’ / स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR) अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
- प्रस्तावित स्थापित क्षमता: २ X २२० मेगावॅट ते ६ X १२०० मेगावॅट
- प्रस्तावित गुंतवणूक: ₹८,००० कोटी ते तब्बल ₹२,००,००० कोटी (२ लाख कोटी) पर्यंत.
- रोजगार संधी: ३,००० प्रत्यक्ष + १,००,००० अप्रत्यक्ष = एकूण १,०३,००० रोजगार (कोकणातील सर्वात मोठी रोजगार निर्मिती).
सिंधुदुर्ग जिल्हा: देवगड येथे एनटीपीसीचा (NTPC) महाप्रकल्प
रत्नागिरीसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही या ऊर्जा क्रांतीचा मोठा फायदा मिळणार आहे. देशातील आघाडीची सरकारी वीज उत्पादक कंपनी ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ (NTPC) सिंधुदुर्गात पाऊल टाकत आहे.
देवगड (जि. सिंधुदुर्ग) अणुऊर्जा प्रकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे एनटीपीसी (NTPC) तर्फे अत्याधुनिक ६ युनिट्स असणारा मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
- प्रस्तावित स्थापित क्षमता: एकूण ६ युनिट्सद्वारे ४,००० ते ७,२०० मेगावॅट (MW)
- प्रस्तावित गुंतवणूक: ₹१,००,००० कोटी (१ लाख कोटी)
- रोजगार संधी: ५,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार.
संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ६.५ लाख कोटींची गुंतवणूक आणि २५,४०० मेगावॅट ऊर्जा
कोकणातील या ३ मुख्य प्रकल्पांव्यतिरिक्त ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) देखील राज्यात ₹२,००,००० कोटींची गुंतवणूक करून ५००० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण ६,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, २५,४०० मेगावॅट वीज निर्मिती आणि एकूण १,२३,५०० रोजगार निर्माण होणार आहेत.
कंपन्यांना जागा सर्वेक्षणाचे आणि गतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात अधिक वेगाने प्रगती करेल. या प्रकल्पांमुळे राज्याचा विकास तर होईलच, पण मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतील.” संबंधित कंपन्यांनी केवळ करारापुरते मर्यादित न राहता प्रकल्पांच्या जागांचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच राज्य शासनाचा ऊर्जा विभाग या कामी पूर्ण सहकार्य करेल, अशी हमीही त्यांनी दिली.
या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मंत्री अतुल सावे, अदानी समूहाचे विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे रंजय शरण, एनटीपीसीचे सीईओ अर्णदा प्रसाद सामल आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.














