Raigad-Ratnagiri-Sindhudurg Vidhan Parishad Election: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस

रत्नागिरी : विधान परिषदेच्या रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी, येत्या १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सोमवार, दि. १ जून रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने आता शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे नेमके कोण उमेदवार अर्ज भरतील, ही उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतील एकूण १६ मतदान केंद्रांवर १,०१८ मतदार मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथील ‘सिंचन भवन’ येथे होणार आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था असे या मतदारसंघाचे सर्वसामान्य नाव असून, रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ असे त्याचे अधिकृत नाव आहे. यामध्ये तीनही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद व नगर पंचायतींचे सदस्य आणि नगराध्यक्ष तसेच पंचायत समित्यांचे सभापती मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यात मिळून एकूण ९६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या निवडणुकीसाठी १ जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, अजूनही एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी सोमवारी, दि. १ जून रोजी नेमके किती उमेदवार अर्ज भरणार, ही उत्सुकता लागून राहिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 30-05-2026