महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार; १६ बेड व मशिनद्वारे सेवा सुरू
रत्नागिरी: Ratnagiri Dialysis Center Services च्या माध्यमातून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभाग जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हजारो गरीब व गरजू रुग्ण या विभागातील मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत.
पूर्वी ज्या रुग्णांना डायलिसिस उपचारांसाठी कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत होते, त्यांना आता रत्नागिरीतच ही सेवा मोफत उपलब्ध झाली आहे. जून २०२५ ते जून २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्हाभरातील १०२४ नियमित रुग्णांनी या विभागाचा लाभ घेतला असून, एकूण ९ हजार ७६ डायलिसिस सायकल्स यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
Ratnagiri Dialysis Center Services मध्ये मोफत औषधे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या विभागातील उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका आणि नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) डॉ. अमेय बेडेकर यांच्या थेट देखरेखीखाली रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताच्या विविध तपासण्या आणि लागणारी महत्त्वाची इंजेक्शन्स पूर्णपणे मोफत दिली जातात. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या विभागात सध्या १६ बेड आणि मशिन्स कार्यरत असून, संसर्गबाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांसाठी २ स्वतंत्र बेड आणि मशिन्सची वेगळी आयसोलेशन रूममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
दरमहा ७० ते ८० नियमित रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून महिन्याला सुमारे ६५० ते ७०० सायकल्स होतात. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी काळात बेड आणि मशिनची संख्या अधिक वाढवली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्पष्ट केले आहे. या सुविधेमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांचा आर्थिक भार पूर्णपणे कमी झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 01-08-2026














