महामार्गाच्या कामामुळे संगमेश्वरला ‘चिखलाचे साम्राज्य’; पैसा फंड स्कूलच्या विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

बंद सेवा रस्ते आणि ढोपरभर चिखलामुळे पालक अन् शाळा व्यवस्थापन आक्रमक; आंदोलनाचा इशारा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या धिम्या गतीने सुरू असलेल्या कामांमुळे संगमेश्वर परिसरातील नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या निष्काळजीपणाचा मोठा फटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध पैसा फंड इंग्लिश स्कूलजवळ सेवा रस्ते बंद ठेवण्यात आल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज ढोपरभर चिखल तुडवत धोकादायक रीतीने शाळेत जावे लागत आहे. या प्रकारामुळे पालक, शाळा व्यवस्थापन आणि संस्था प्रशासनाने अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे.

बसस्थानक अन् सोनवी चौकात चिखलाचे साम्राज्य; तक्रारींकडे दुर्लक्ष

संगमेश्वर बसस्थानक आणि सोनवी चौक परिसरात आधीच सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रोजच नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार अथवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सेवा रस्ते बंद केल्याने विद्यार्थ्यांसमोर एकमेव चिखलमय मार्ग

पैसा फंड इंग्लिश स्कूलजवळ उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते माती आणि खडीचे मोठे ढिगारे टाकून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीच्या पर्यायी मार्गाचा वापर करता येत नाही. त्यातच जाखमाता मंदिराजवळील एकमेव उपलब्ध सेवा रस्त्यावरून ठेकेदाराची अवजड वाहने सतत ये-जा करत असल्याने हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना चिखलातूनच कसरत करत शाळेत प्रवेश करावा लागत आहे.

उड्डाणपूल असूनही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शाळा व्यवस्थापनाच्या मते, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणपूल उभारण्यात आला असला तरी सेवा रस्ते बंद असल्याने त्याचा कोणताही अपेक्षित लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही. उलट विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडूनच धोकादायक पद्धतीने शाळेत यावे-जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्ग न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा आणि केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा

संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने बंद असलेले सेवा रस्ते मोकळे करून रस्त्यावरील चिखल हटवावा, अन्यथा विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा शाळा व्यवस्थापन, संस्था आणि पालकांनी दिला आहे. तसेच, या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महामार्गाच्या अभियंत्यांनी त्वरित लक्ष न दिल्यास थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यांकडे तक्रार निवेदन सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.