गाडीच्या काचा पुसताना अचानक घडला अपघात; उपचारापूर्वीच डॉक्टरांकडून मृत घोषित
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. तिवरे फणसवाडी येथील पुलावर उभा असलेला २० वर्षीय तरुण अचानक नदीच्या पात्रात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अलोरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुलावर उभे असताना अचानक घडला अपघात
सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या खेर्डी (ता. चिपळूण) येथील होंडा शोरूमजवळ राहणारा राजवर्धन किरण संगा (वय २० वर्षे) हा त्याचा मित्र मोहम्मदन नासीर अब्दुल रहिम खान याच्यासोबत ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३५ वाजण्याच्या सुमारास तिवरे फणसवाडी येथील पुलावर उभा होता. यावेळी खबर देणारा मित्र आपल्या गाडीच्या काचा पुसत असताना राजवर्धन हा अचानक पुलावरून खाली पात्रात पडला आणि पाण्याच्या वेगात वाहून जाऊ लागला.
शोध मोहिमेनंतर झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
मित्र पाण्यामध्ये वाहून जात असल्याचे दिसताच मोहम्मदन नासीर याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ त्याचा शोध सुरू केला. शोध घेत सर्वजण गंगेचीवाडी तिवरे येथे गेले असता, राजवर्धन हा नदीच्या किनारी असलेल्या झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत मिळून आला.
कामथे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी घोषित केले मृत
स्थानिकांनी त्याला तातडीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
अलोरे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
या घटनेबाबत मयताचा मित्र मोहम्मदन नासीर अब्दुल रहिम खान याने दिलेल्या माहितीवरून अलोरे पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक १८/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अलोरे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.














