Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा नवा रेकॉर्ड! ५ नवीन न्यायाधीशांनी घेतली शपथ; पहिल्यांदाच संख्या ३७ वर

देशाच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आज एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पाच नवीन न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या नवीन नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या आता ३७ वर पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात न्यायाधीशांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आता मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी केवळ एकच पद रिक्त राहिले आहे.

सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने २७ मे रोजी या नावांची शिफारस केली होती, ज्याला केंद्र सरकारने अवघ्या चार दिवसांत मंजुरी दिली.

‘या’ पाच न्यायाधीशांनी घेतली शपथ:
१. जस्टिस व्यंकिता सुब्रमणि मोहना (वरिष्ठ वकील)
२. जस्टिस श्री चंद्रशेखर (मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश)
३. जस्टिस शील नागू (पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश)
४. जस्टिस संजीव सचदेवा (मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश)
५. जस्टिस अरुण पल्ली (जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश)

थेट वकिलीतून न्यायाधीश होणाऱ्या दुसऱ्या महिला: व्ही. एस. मोहना
या नियुक्त्यांमध्ये वरिष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणि मोहना यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा (२०१८) यांच्यानंतर थेट बार असोसिएशनमधून (वकिली क्षेत्रातून) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला वकील ठरल्या आहेत. ५९ वर्षीय मोहना यांनी १९८८ मध्ये कोईम्बतूर लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले होते. २०१५ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून दर्जा मिळाला होता.

न्यायमूर्ती मोहना यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात दोन महिला न्यायाधीश झाल्या आहेत. यामध्ये न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचाही समावेश आहे, ज्या २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची सदस्यसंख्या ३४ वरून ३८ केली
गेल्या महिन्यात सरकारने एका अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ३४ वरून वाढवून ३८ (मुख्य न्यायाधीशांसह) केली होती. संख्या वाढल्यामुळे आणि आधीच्या रिक्त पदांमुळे एकूण ६ जागा रिकाम्या होत्या. पाच नवीन न्यायाधीशांच्या शपथविधीनंतर आता केवळ १ पद रिक्त आहे. मात्र, जून महिन्यातच दोन न्यायाधीश निवृत्त होत आहेत. यामध्ये न्यायमूर्ती पंकज मिथल १६ जून रोजी आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी २८ जून रोजी निवृत्त होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 02-06-2026