PM Kisan 24th installment: पीएम किसानचा २४ वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा; महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना लाभ

PM Kisan 24th installment: पीएम किसानचा २४ वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा; महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकर्‍यांना लाभ

गुजरातमधील बनासकांठा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निधी वितरित; राज्यातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये हस्तांतरित

PM Kisan 24th installment च्या अंतर्गत देशातील आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पात्र शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून एकट्या महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांत तब्बल १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राचे सर्वसमावेशक धोरण

निधी वितरणाच्या या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ थेट आर्थिक सहाय्यच देत नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि कृषीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य देत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावरून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे (व्हर्च्युअल) सहभाग नोंदवला. या प्रसंगी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग हेदेखील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम विविध योजनांच्या माध्यमातून मिळाली असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी नमूद केले. तसेच देशातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kohinoor furni.1

खतांवरील सबसिडी आणि पीक विम्यातून मोठा आधार

जागतिक बाजारात खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली असतानाही केंद्र सरकारने त्याचा कोणताही अतिरिक्त भार देशातील शेतकऱ्यांवर पडू दिला नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांना अत्यंत परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय, गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या (MSP) माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाली आहे.

पीएम कुसुम आणि पशुपालनाला विशेष प्रोत्साहन

शेतकऱ्यांचा सिंचनावरील होणारा मोठा खर्च कमी करण्यासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप वितरित करण्यात आले आहेत. या सौरपांमांमुळे शेतकऱ्यांची तब्बल ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली असून अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ होत आहे. यासोबतच, बदलत्या हवामानाशी सुसंगत असणाऱ्या बियाण्यांच्या सुमारे ३ हजार नव्या जाती विकसित करून त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ राबवले जात असून, लाळ्या-खुरकुत रोगापासून बचाव करण्यासाठी मोफत १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत, ज्याचा लाभ ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला झाला आहे. यामुळे देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील ५ लिटरवरून वाढून आता सुमारे ८ लिटरपर्यंत पोहोचले आहे. शेवटी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.