रत्नागिरी : गोवंशाची अवैध वाहतूक, खरेदी-विक्री अथवा कत्तलीसाठी होणारा बेकायदेशीर व्यापार गंभीर व दंडनीय गुन्हा असून याला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘रत्नसेतू’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातून गोवंशाची होणारी अवैध वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांतून रात्री वाहनांमधून जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महामार्गावरील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर नाकेबंदी आणि गस्त वाढवली आहे. महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा 1976 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत गोवंशाची कत्तल, वाहतूक आणि व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. कायद्याचे उल्लंघन करून अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
या मोहिमेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिस प्रशासनास माहिती द्यावी. ही एक माहिती अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचवू शकते. गोवंशाची अवैध वाहतूक किंवा कत्तलीची माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा रत्नागिरी पोलिसांच्या ‘रत्नसेतू’ या 9371415612 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 12-06-2026














