‘अखंड भारत : १२ वर्षांची विकासगाथा’ पुस्तिकेचे चिपळूणला वितरण

रत्नागिरी : मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त चिपळूणमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘अखंड भारत : १२ वर्षांची विकासगाथा’ पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

देशाच्या विकासप्रवासातील विविध घडामोडी, समस्या, उपाययोजना आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांनी केले असून, राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी खेर्डी येथील स्वामींनी निवास साई मंदिर येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

श्री. यादव म्हणाले की, पत्रकारांनी आपली लेखणी व वृत्तांकनाच्या माध्यमातून केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर समाज, राज्य आणि राष्ट्राला दिशा देण्याचे कार्य केले आहे. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पत्रकारांनी लोकहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत विधायक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त ७ ते २५ जून या कालावधीत देशभर आणि महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. राष्ट्रहिताच्या कार्यात पत्रकारांचे सहकार्य भविष्यातही लाभत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, सरचिटणीस स्वानंद रानडे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आदिती गुडेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 12-06-2026