महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांना मिळणार तातडीची डिजिटल सुविधा
मुंबई : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत, केंद्र सरकारचे आघाडीचे डिजिटल दस्तऐवज वॉलेट असलेल्या डिजिलॉकरसोबत आता महासारथी (कौटुंबिक ओळखपत्र) देखील जोडण्यात आले आहे.
डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा वितरण प्रणालीला बळकटी देण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे. या एकात्मिकरणामुळे महाराष्ट्रातील जवळपास 14 कोटी नागरिक आता कुठेही आणि कधीही त्यांचे महासारथी ओळखपत्र डिजिटल स्वरूपात आणि सुरक्षितपणे मिळवू शकतात, साठवू शकतात तसेच सामायिकही करू शकणार आहेत.
या एकात्मिकरणामुळे महासारथी आणि डिजिलॉकर दरम्यान दुहेरी कार्यपद्धतीचा सुलभतेने वापर करणे शक्य झाले आहे. ज्या नागरिकांकडे आधीपासूनच महासारथी (कौटुंबिक ओळखपत्र) आहे, असे नागरिक हे ओळखपत्र मिळवून त्यांच्या डिजिलॉकर खात्यामध्ये सुरक्षित ठेवू शकतात. याव्यतिरिक्त, डिजिलॉकर आता महासारथीसोबत (कौटुंबिक ओळखपत्र) रिक्वेस्टर प्लॅटफॉर्म अर्थात विनंत्या नोंदवण्याचे व्यासपीठ म्हणून जोडले गेले आहे. यामुळे पात्र रहिवाशांना नवीन कौटुंबिक ओळखपत्रासाठी डिजिटल पद्धतीने नावनोंदणी करणे आणि ॲप्लिकेशनचा वापर करून थेट आपली संमती देणे शक्य होणार आहे.
महासारथी (कौटुंबिक ओळखपत्र) हा महाराष्ट्रातील कुटुंबांची ओळख पडताळणी करण्याचा एक मूलभूत दस्तऐवज आहे. सरकारी सेवा, कल्याणकारी योजना आणि नागरिकांचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचे असते. आता हे ओळखत्र डिजिलॉकरवरही उपलब्ध करून दिले गेल्यामुळे, कागदपत्रविरहित प्रशासनालाही मोठी चालना मिळू शकेल, प्रत्यक्ष दस्तऐवज बाळगण्यावरचे अवलंबित्व कमी होईल आणि नागरिकांपर्यंत सेवा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकणार आहे.
नागरिक डिजिलॉकरवर त्यांचे महासारथी (कौटुंबिक ओळखपत्र) कसे मिळवू शकतात:
नागरिक खाली नमूद चार टप्प्यांची सोपी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे महासारथी (कौटुंबिक ओळखपत्र) मिळवू शकतात:
डिझिलॉकरचे मोबाईल ॲप्लिकेशन उघडा किंवा www.digilocker.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन साईन-इन करा.
Issued Documents या पर्यायावर जा किंवा महासारथी / फॅमिली आयडी महाराष्ट्र (Mahasarathi / Family ID Maharashtra) यासंबंधीचे पर्याय शोधा.
आवश्यक तपशील भरा आणि आपली संमती द्या.
ओळखपत्र मिळवा (फेच करा), हे तुम्हाला त्वरित जारी केले जाईल आणि त्यानंतर ते लगेचच डिजिलॉकर खात्यात सुरक्षितपणे साठवून ठेवले जाईल.
नागरिकांसाठी मिळणारे मुख्य लाभ :
मूळ प्राधिकरणाद्वारे थेट जारी केलेले आणि कायदेशीररित्या वैध असलेले डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार.
जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा त्वरित पडताळणी आणि सुरक्षितपणे डिजिटलरित्या सामायिक करण्याची सुविधा उपलब्ध होणार.
नागरिक-केंद्रित सेवा आणि सरकारी कल्याणकारी योजनांचा जलद आणि सुलभतेने लाभ मिळवता येणार.
आपले सरकार या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध अर्ज आणि सेवा वितरणासाठी कुटुंबाशी संबंधित माहितीचे सोयीस्करपणे व्यवस्थापित करणे शक्य होणार.
प्रत्यक्ष दस्तऐवज बाळगण्याचा व्याप कमी होणार आणि सरकारी लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार.
केंद्र सरकार कार्यक्षम प्रशासनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. हा उपक्रम या प्रयत्नांमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. याअंतर्गत विश्वासार्ह डिजिटल ओळखपत्र विषयक सुविधा सुरक्षित आणि संमती आधारित तत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या संकल्पाला पुढची दिशा मिळाली असून, पारदर्शक, कार्यक्षम तसेच डिजिटल दृष्टीने सक्षम प्रशासकीय आराखड्यालाही बळकटी मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 18-06-2026














