Monsoon 2026 Update: २४ जूनपासून किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होण्याचा अंदाज; देशभरात ४१ टक्के पावसाची तूट

नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्रातच रखडला

मुंबई/नवी दिल्ली: मान्सून २०२६ च्या वाटचालीबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) चिंताजनक आकडेवारी जाहीर केली आहे. नैऋत्य मान्सून सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला असून ४ ते १८ जून या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या १४ दिवसांच्या कालावधीत देशात ७२.२ मिमी अपेक्षित पाऊस होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ ४२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपासून रखडलेली मान्सूनची ही वाटचाल पुढील आठवड्यात, म्हणजेच २४ ते २५ जूनपासून पुन्हा गतिमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनची उत्तर सीमा ‘हर्णे-सोलापूर’वर स्थिर

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून ८ जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात वेळेत दाखल झाला होता. सामान्यतः १० ते १५ जून दरम्यान या भागात सर्वदूर पाऊस सुरू होणे अपेक्षित होते, परंतु १७-१८ जूनपर्यंत मान्सूनची पुढची चाल पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मान्सूनची उत्तर सीमा सध्या हर्णे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवरून जात असून ती एकाच ठिकाणी स्थिर आहे. मात्र, पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा अनुकूल होत आहे.

२२ जूनपर्यंत केवळ तुरळक पाऊस; मुंबईत विलंबाचा नवा विक्रम?

राज्यातील पावसाच्या सद्यस्थितीचा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, २२ जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात केवळ तुरळक पावसाची शक्यता आहे. या काळात कोणतीही अतिवृष्टी किंवा सर्वदूर पाऊस पडणार नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबईचा विचार करता, यंदा मुंबईत मान्सूनच्या विलंबाने आगमनाचा एक नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन पेरणीच्या आणि शेतीच्या सुरुवातीच्या दिवसांत पाऊस लांबल्याने बळीराजासह संपूर्ण प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Mahrashi karve ANM

२४ जूनपासून किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होणार

न्यूमेरिकल वेदर मॉडेलच्या संकेतांचा हवाला देत कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, २४ आणि २५ जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे. २५ ते २८ जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होत आहेत. पश्चिम किनारपट्टीवर २४ जूनपासून पावसाची गती वाढेल आणि २६ व २७ जूनच्या सुमारास हा मान्सून उत्तर कोकणात धडकण्याची शक्यता आहे. या सक्रियतेमुळे रखडलेल्या पावसाची कसर भरून निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 19-06-2026