मुंबई: Uddhav Thackeray Speech | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडणाऱ्या बंडखोर खासदारांवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “सध्या देशातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला असून, भाजपची वाटचाल ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कडून आता ‘वन नेशन, नो इलेक्शन’च्या दिशेने सुरू आहे. ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आता देशाला आणि आपल्या सर्वांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावं लागेल,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिवसैनिकांना केले.
ठाकरे कुटुंबावरील आरोपांना आणि बदनामीला प्रत्युत्तर आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या चिखलफेकीचा समाचार घेतला. “मातोश्रीवर शिंतोडे उडवणारी ही औलाद कोणाची आहे?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांना सुनावले. जुन्या रूढी आणि ब्राह्मणी वृत्ती मोडून काढण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे उभे राहिले होते, याची आठवण करून देत त्यांनी पुढे म्हटले की, माझ्यावर, माझी पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस यांच्यावर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी केली जात आहे. शिवसेना स्थापनेचा नारळ आपल्यासमोर फुटला असून आपण सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक आहोत, असे सांगत त्यांनी ठाकरेंनी नेमके काय सोसले आणि भोगले आहे, याकडे लक्ष वेधले.
गद्दारीबाबत मतदारांची माफी आणि सत्तापिपासू वृत्तीवर टीका पक्षातून निवडून आल्यानंतर गद्दारी करणाऱ्या खासदारांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी थेट मतदारांची माफी मागितली. “पंतप्रधान मोदींची लाट असतानाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे ९ खासदार डोलाने निवडून दिले होते, मात्र त्यांनी गद्दारी केली,” असे ठाकरे म्हणाले. “मरमर आपण करायची, माणसे आपण निवडून आणायची आणि नंतर खोके देऊन हे त्यांना घेऊन जाणार असतील, तर याच्यापुढे शिवसेना निवडणूक लढवणार नाही, माझ्यासोबत किती जण राहतील?” असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला. तसेच, मेहनत करून निवडून आणलेल्या या खासदारांना आता जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार जनतेचाच आहे, असेही ते म्हणाले.
‘शेंडी-जाणव्याचं’ नव्हे, तर ‘राष्ट्रीयत्व’ हेच आमचं हिंदुत्व! भाजपच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेवर प्रहार करताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, आमचे हिंदुत्व हे ‘शेंडी-जाणव्याचे’ नसून ‘राष्ट्रीयत्व’ हेच आमचे हिंदुत्व आहे. “आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही खरे देशप्रेमी आहोत. माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) विरोध करणारे गोमूत्रधारी होते,” असा टोला त्यांनी लगावला. “भेसळयुक्त रक्त कधीही हातात भगवा घेऊ शकत नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या विचारसरणीवर आक्षेप घेतला.
ईव्हीएम आणि लाडकी बहीण योजनेवरून सरकारला घेरले निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, “आम्ही म्हणतो मशाल समोरचे बटण दाबा मत आम्हाला मिळेल, पवारसाहेब म्हणतात तुतारीचे बटण दाबा मत आम्हाला मिळेल; पण भाजपवाले म्हणतात कोणाचेही बटण दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.” याशिवाय, निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा समाचार घेताना, आधी योजना आणली आणि नंतर लगेच ८० लाख बहिणींना या योजनेतून बाहेर काढल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या हेतूवर तीव्र शंका उपस्थित केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 20-06-2026














