अमेरिका आणि इटलीतील संबंध ताणले; संतापलेल्या इटलीने उपपंतप्रधानांचा अमेरिका दौरा केला रद्द
रोम / वॉशिंग्टन: Trump Meloni Controversy मुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी गयावया केली होती आणि मला त्यांची कीव आली,” या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “खोट्यालाही काही मर्यादा असतात, इटली कधीही कोणासमोर भीक मागत नाही,” अशा कडक शब्दांत मेलोनी यांनी आपला संताप व्यक्त केला असून ट्रम्प यांचे विधान पूर्णपणे लज्जास्पद आणि तथ्यांपासून कोसो दूर असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नेमका दावा काय होता? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जी-७ शिखर परिषदेतील (G7 Summit) एका फोटोचा संदर्भ देत जॉर्जिया मेलोनी यांच्यावर अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली होती. ट्रम्प म्हणाले होते की, “जॉर्जिया मेलोनी यांनी जी-७ परिषदेत माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः विनवण्या केल्या होत्या. मला त्यांची दया आली, म्हणून मी त्यांच्यासोबत फोटो काढू दिला. मी नकारही देऊ शकलो असतो, पण मला त्यांची कीव आली.” ट्रम्प यांच्या याच अहंकारयुक्त विधानानंतर दोन्ही देशांमधील वादाला तोंड फुटले आहे.
मित्र देशांसोबत असे वर्तन? मेलोनी यांचा थेट सवाल डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा समाचार घेताना जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच सर्वात विश्वासू मित्र देशांसोबत अशा प्रकारचे वर्तन करतात, हे पाहून आपल्याला अत्यंत आश्चर्य आणि दुःख झाले आहे. ट्रम्प यांच्या तोंडच्या या केवळ थापा आहेत. “जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांचे विरोधक आणि अमेरिकेच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांसमोर का दाखवत नाहीत? ट्रम्प हे अशा जागतिक नेत्यांबद्दल मवाळ भूमिका घेतात, ज्यांची धोरणे पाश्चात्य देशांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात आहेत,” असा थेट आणि गंभीर आरोप मेलोनी यांनी ट्रम्प यांच्यावर केला.
अपमानाचा निषेध करत इटलीचा अमेरिका दौरा रद्द या वादाचे थेट पडसाद आता अमेरिका आणि इटली या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांवर उमटू लागले आहेत. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि अपमानास्पद आहे. हा केवळ एका महिला पंतप्रधानाचा नाही, तर संपूर्ण इटली देशाचा आणि तिथल्या जनतेचा अपमान आहे,” असे तजानी यांनी स्पष्ट केले. या अपमानाचा निषेध म्हणून तजानी यांनी २१ आणि २२ जून रोजी होणारा आपला अधिकृत अमेरिका दौरा तात्काळ रद्द केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 20-06-2026














