संसदेच्या १२० जागांसाठी चुरस; ६१ चा जादुई आकडा गाठण्यासाठी राजकीय जोडप्यांची जुळवाजुळव
Israel Election 2026 : मध्य पूर्वेतील अत्यंत संवेदनशील देश असलेल्या इस्रायलमध्ये राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रत्यक्ष मतदान आणि निकालांची तयारी पूर्ण झाली आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेले ७६ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू आपले राजकीय स्थान टिकवून ठेवणार की इस्रायलला नवा नेता मिळणार, या एकाच मध्यवर्ती मुद्द्याभोवती संपूर्ण निवडणूक केंद्रित झाली आहे. इस्रायलमधील सध्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ‘नेतान्याहू समर्थक विरुद्ध नेतान्याहू विरोधक’ अशा थेट ध्रुवीकरणात विभागले गेले असून, सत्तास्थापनेत नेमके काय घडणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
संसदेचे गणित: बहुमतासाठी ६१ चा जादुई आकडा
इस्रायलच्या १२० जागांच्या संसदेत (नेसेट) सत्ता स्थापनेसाठी ६१ जागांची आवश्यकता असते. इस्रायलमध्ये संपूर्ण देश हाच एक मतदारसंघ मानला जातो आणि मतदार वैयक्तिक उमेदवारांऐवजी पक्षाला मतदान करतात. संसदेत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी किमान ३.२५% ते ३.५% मतांचा कोटा पार करणे बंधनकारक असते. १९४८ पासून आजवर एकाही पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे निकालांनंतर कोणती आघाडी ६१ चा आकडा गाठणार, यावरच पुढील सरकारचे भविष्य अवलंबून आहे.
सद्यस्थितीतील संभाव्य बलाबल (ओपिनियन पोल्स अंदाज)
ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार विविध पक्षांचे संभाव्य चित्र पुढीलप्रमाणे आहे:

गादी आयझनकोट गट : २१ जागा (नेतान्याहू विरोधी / सुरक्षा व प्रशासकीय सुधारणा)
लिकुड (बेंजामिन नेतान्याहू) : १९ जागा (सत्ताधारी उजवी आघाडी / नेतान्याहूंचे नेतृत्व)
बी अख्खाद (बेनेट + लापिड युती) : तिसऱ्या क्रमांकावर (मध्यमार्गी व उजवी आघाडी / नेतान्याहू विरोधी)
धार्मिक ज्यू पक्ष (हारेदी घटक) : १५ जागा (पारंपरिक उजवे / नेतान्याहूंचे संभाव्य सहकारी)
अरब पक्ष (राम पक्षासह) : १३ जागा (निर्णायक किंगमेकर भूमिका)
इतर (द डेमोक्रॅट्स – १०, इस्रायल बेतेन्यू – ८) : १८ जागा (प्रामुख्याने नेतान्याहू विरोधी भूमिका)
आगामी संभाव्य राजकीय समीकरणे
नेतान्याहूंचा गड धोक्यात, विरोधकांचे पारडे जड : निवडणूक पूर्व कलांनुसार नेतान्याहू यांच्या ‘लिकुड’ पक्षाला केवळ १९ जागा मिळण्याचा अंदाज असून माजी लष्करप्रमुख गादी आयझनकोट यांचा गट २१ जागांसह आघाडीवर आहे. नफ्ताली बेनेट आणि याईर लापिड यांच्या ‘बी अख्खाद’ युतीने कडवे आव्हान उभे केल्याने नेतान्याहू विरोधी गटाला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही आघाड्यांमध्ये ५०-५२ जागांची चुरस : नेतान्याहू समर्थक आणि विरोधक या दोन्ही प्रमुख आघाड्या ५० ते ५२ जागांच्या आसपास अडकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे कोणत्याही एका आघाडीला थेट ६१ जागा मिळणे कठीण ठरणार आहे.
अरब आणि लहान पक्ष ठरणार ‘किंगमेकर’ : सुमारे १३ जागा जिंकण्याची क्षमता असलेले अरब पक्ष आणि अविगदोर लिबरमन यांचा ‘इस्रायल बेतेन्यू’ पक्ष सरकार स्थापनेत निर्णायक ठरतील. अरब पक्षांचा पाठिंबा कोणाला मिळतो, यावर सरकारचे अस्तित्व अवलंबून असेल.
मतदानानंतर वाटाघाटीचे पर्व : मतदान झाल्यानंतर प्रत्यक्षात नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठी किमान १ ते २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. आघाडी तोडणे, मंत्रिपदांची वाटणी आणि अंतर्गत अटी यांवरून तीव्र राजकीय सौदेबाजी पाहायला मिळेल.
निवडणुकीचे कळीचे मुद्दे
सुरक्षा आणि युद्धाचे सावट : ७ ऑक्टोबर २०२३ च्या हमास हल्ल्यानंतर भडकलेले युद्ध, सक्तीची लष्करी सेवा, राखीव सैनिकांचे योगदान आणि बंधकांची सुटका हे मतदारांच्या मनातील सर्वात मोठे भावनिक मुद्दे आहेत.
आर्थिक स्थैर्य : युद्धाच्या झळा सोसूनही इस्रायलची अर्थव्यवस्था मजबूत राहिली असून दरडोई उत्पन्न ५० ते ७० हजार डॉलर्सच्या घरात टिकून आहे. मात्र अंतर्गत राजकीय स्थैर्यासाठी जनतेला नवा चेहरा हवा की जुनाच अनुभवी नेता, याचा पेच कायम आहे.













