NEET Exam Scam: ‘नीट’ घोटाळ्याविरोधात जंतर-मंतरवर आज भव्य आंदोलन; ‘ताट-चमचे’ आणण्याचे अनोखे आवाहन

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत दुसरे मोठे शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली: NEET Exam Scam च्या गंभीर प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असताना, या कथित पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या विरोधात आज, शनिवार (२० जून २०२६) रोजी राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर तरुण आणि विद्यार्थ्यांची संघटना ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) कडून भव्य निषेध आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व समर्थकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्यासोबत ‘ताट आणि चमचे’ घेऊन येण्याचे एक अनोखे आवाहन केले आहे, ज्यामुळे या आंदोलनाची राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.

पंतप्रधानांच्या ‘थाळी बजाओ’ आवाहनाची करून दिली आठवण सोशल मीडियावर जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात अभिजीत दीपके यांनी आंदोलनाचा हेतू स्पष्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्यासोबत ताट आणि चमचा नक्की घेऊन यावा. बाकीची कथा तर तुम्हाला माहीतच आहे.” या माध्यमातून त्यांनी कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाईन वर्कर्सचे आभार मानण्यासाठी देशवासीयांना केलेल्या ‘थाळी बजाओ’ आवाहनाची आठवण करून देत, आता विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ताट-चमचे वाजवले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दिल्ली पोलिसांची परवानगी; दुपारी १ वाजता ठिय्या आंदोलन युवा नेतृत्वाखालील या संघटनेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २० जून रोजी दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनासाठी त्यांना दिल्ली पोलिसांकडून रीतसर मंजुरी मिळाली आहे. या आंदोलनादरम्यान देशभरातून गोळा झालेले विद्यार्थी आणि तरुण नीट पेपर लीक वादावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि कष्टाशी खेळ झाला असून या संपूर्ण प्रकरणात सरकारची उत्तरदायित्व आणि जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका या संघटनेने घेतली आहे.

देशातील अनेक शहरांनंतर दिल्लीत दुसरे मोठे आंदोलन ६ जून रोजी जंतर-मंतर मैदानावर झालेल्या पहिल्या यशस्वी आंदोलनानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे दिल्लीतील हे दुसरे मोठे आंदोलन आहे. यापूर्वी या युवा संघटनेने पुणे, लखनऊ, अमृतसर, बेंगळुरू, हैदराबाद आणि जयपूरसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात आणि एनटीएच्या (NTA) कारभाराविरोधात आक्रमक निदर्शने करत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला आहे.

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटींच्या मदतीची मागणी अभिजीत दीपके यांनी केवळ शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट एक मोठी मागणीही केली आहे. परीक्षांमधील घोळ, अनिश्चितता आणि वाढत्या मानसिक तणावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कथितरीत्या टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परीक्षांमधील या अनागोंदी कारभारामुळे आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले असून, त्यापैकी ५ मृत्यू तर गेल्या ४८ तासांत झाले असल्याचा गंभीर दावा दीपके यांनी केला आहे. पुन्हा परीक्षा होणार की नाही, यावरून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक ताण प्रचंड वाढला असून सरकारने यावर तात्काळ ठोस आणि पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 20-06-2026