Monsoon Session Assembly म्हणजेच राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे सुरू होत असून, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. विरोधकांनी सरकारच्या पारंपारिक चहापान कार्यक्रमावर अधिकृत बहिष्कार टाकल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “आमचा प्रयत्न नेहमीच संवादाचा राहिला आहे; विरोधकांनी संवाद ठेवला तर चर्चेतून प्रत्येक गोष्टीचे उत्तर देण्यास सरकार तयार आहे, पण जर केवळ राजकारण करायचे असेल, तर त्याला राजकीय भाषेतच उत्तर मिळेल, आणि समाजकारण केल्यास सामाजिक उत्तर दिले जाईल,” अशी कडक भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. विरोधकांनी उपस्थित केलेल्या कंत्राटांमधील ५६ टक्के कमिशनचे आरोप, शेतकरी कर्जमाफी आणि राज्यातील संभाव्य दुष्काळ यासारख्या गंभीर विषयांवर सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चहापानावर केवळ राजकीय हेतूने बहिष्कार न घालता विरोधक जर चर्चेला आले असते, तर लोकहिताच्या मुद्द्यांवर सकारात्मक विचारविनिमय शक्य झाला असता, असे मत सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केले. विरोधकांना जनतेचे नेमके प्रश्नच अवगत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली, ज्यामुळे आगामी अधिवेशनात या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंमध्ये मोठा सामना होण्याची चिन्हे आहेत.
‘ऑपरेशन टायगर’वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी
उद्धवसेना खासदारांनी उपस्थित केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. “आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, तर ते पूर्ण करतो, याचा अनुभव तुम्हाला आधीच आलेला आहे. थोडे थांबा, लवकरच तुम्हाला या संदर्भात ब्रेकिंग न्यूज मिळेल,” असे शिंदे म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही, “ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले असून सध्या बॉडी अगदी सदृढ आहे,” असा मिश्किल टोला लगावत विरोधकांच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली.
पक्षप्रमुखपदाच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखपद सोडण्याबाबत केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी “ओसाड गावाची पाटीलकी मी सोडतो, असे म्हणणे कितपत योग्य आहे हे विचार करण्यासारखे आहे,” असे म्हटले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “आता पक्षात कोणी शिल्लकच राहिले नाही, तर राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय काय उरतो,” असा थेट टोला लगावला. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर समाजमाध्यमांवरील एका मिमचा संदर्भ दिला, ज्यामध्ये ‘माझ्याकडे आमदार किंवा खासदार नसल्याने पक्ष सोडून जाण्याची कोणाला भीती नाही, म्हणून मला शांत झोप लागते’ असा आशय व्यक्त करण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 22-06-2026














