Vinayak Raut : गद्दारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी खऱ्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरावे – विनायक राऊत

कोल्हापूर: Vinayak Raut Kolhapur दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर कडाडून टीका केली आहे. गद्दारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी आता खऱ्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी येथे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात राऊत यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मराठी अस्मिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शिवसेनेने तयार केलेले नेते तुम्ही विकत घेतलेत: विनायक राऊत

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. “शिवसेनेने शून्यातून तयार केलेले नेते तुम्ही केवळ सत्तेच्या बळावर विकत घेतले आहेत. मात्र, एक नेता सोडून गेला तरी असे अनेक नेतृत्व निर्माण करण्याची धमक आजही जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी दिल्लीच्या नेत्यांवरही निशाणा साधला. दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रात येऊन राज्याची अवहेलना करावी आणि इथल्या मराठी नेत्यांनी ती गपचूप ऐकून घ्यावी, हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना हा समुद्र आहे, काही थेंबांनी फरक पडत नाही: अरुण दुधवडकर

या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनीही बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. “शिवसेना हा एक अथांग समुद्र आहे, त्यातील एक-दोन थेंब निघून गेल्याने समुद्राला काहीही फरक पडत नाही. ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली, स्वार्थासाठी स्वतःची निष्ठा विकली आणि संधिसाधू राजकारण केले, तेच आज पक्षाबाहेर गेले आहेत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

या सोहळ्याला उद्धवसेनेचे शहरप्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेनेचे प्रमुख उदय दळवी, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, सुनील मोदी यांच्यासह विजय देवणे, रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, मनजित माने आणि रिमा देशपांडे आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि स्मृतींना उजाळा देत, या सोहळ्यात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ हून अधिक मान्यवरांचा ‘मराठी अस्मिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अमोल बुढ्ढे, पद्माकर कापसे, गजानन तोडकर, दिलीप देसाई, दीपक गौड, शीतल धनवडे, राजू सांगावकर, सुजित हिरेमठ, संभाजी भोकरे, राजू यादव, संभाजी पाटील, रघुनाथ टिपुगडे, बाबूराव पाटील, तानाजी आंगडे, कमल पाटील, अस्लम सय्यद, ॲड. सुषमा कवाळे, विष्णू रेडेकर, बाळासाहेब नलवडे, अनिल दबडे, संजय लाड, अजित मोडेकर आणि शुभांगी साळोखे यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 24-06-2026