Sanjay Dina Patil: खासदार संजय दिना पाटील यांची थेट पोलिसांसमोरच पत्रकारांना शिवीगाळ व मारहाणीची धमकी

“परत आलात तर मारून पाठवेन”; संजय राऊतांच्या पत्रावरील प्रतिक्रियेदरम्यान प्रसारमाध्यमांवर खासदार संतापले

मुंबई: Sanjay Dina Patil यांच्या एका नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि वर्तनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे (North East Mumbai) खासदार संजय दिना पाटील यांना आता राजकीय घडामोडींवर पत्रकारांनी विचारलेले परखड प्रश्न बोचू लागले आहेत. खासदार संजय दिना पाटील यांनी गुरुवारी थेट पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, “पुन्हा इकडे आलात तर मारून पाठवेन,” अशी थेट धमकी दिली. खासदार पाटील यांच्या या अरेरावीच्या भाषेमुळे पत्रकारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका वाद काय? का भडकले खासदार?

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय दिना पाटील यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. “माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन, नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडले आहेत,” अशी धक्कादायक फुशारकी त्यांनी मारली होती. या चिथावणीखोर वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवून दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती.

याच संवेदनशील मुद्द्यावर आणि संजय राऊत यांच्या पत्रावर खासदार संजय दिना पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकार गेले होते. तसेच, पत्रकारांनी त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न ऐकताच खासदारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच पत्रकारांशी गैरवर्तन सुरू केले.

“गां#% बोटं घालताय, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा” – पोलिसांसमोरच अरेरावी

पत्रकारांच्या प्रश्नावर भडकलेले संजय दिना पाटील संतापून म्हणाले, “तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा.”

माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त करत त्यांनी पुढे म्हटले, “तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता? आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय?” मात्र, इतके बोलूनही त्यांनी आपल्या विधानांचे समर्थन केले. “मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय. माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे,” असे त्यांनी छाती ठोकून सांगितले.

“पाच खून माझ्या जन्मापूर्वीचे; मुख्यमंत्र्यांनी मला शाब्बासकी दिली”

आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विधानावर स्पष्टीकरण देताना संजय दिना पाटील म्हणाले की, “आम्ही पाच लोक मारली, असे मी जे बोललो, ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला पाठीशी उभे राहायला दहा लोक लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या या वक्तव्यावर कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही; उलट त्यांनी मला शाब्बासकी दिली आहे. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे आणि मर्दांची कदर कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे.”

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. २००४ मध्ये जेव्हा ते शिवसेनेचे लीलाधार डाके यांच्याविरोधात निवडणूक लढवून जिंकले होते, तेव्हा संजय राऊत यांनीच त्यांना छुपी मदत केली होती, असा दावा त्यांनी केला. तसेच किरीट सोमय्या यांच्याविरोधात लढतानाही राऊत पाठीशी होते, मग ती शिवसेनेशी गद्दारी नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “माझा शिवसैनिकांशी वाद नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माझ्यावर उपकार आहेत, कारण त्यांच्यामुळेच मी खासदार झालो,” अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी शेवटी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 26-06-2026