मुंबई: अयोध्येच्या भव्य राममंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणग्या, दागिने आणि चांदीच्या वस्तूंवर राजरोसपणे डल्ला मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या चोरीप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) केंद्र सरकार, भाजप आणि ‘सकल हिंदू समाज’ या संघटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागण्यात आली आहे.
राम मंदिरात लूट होऊनही ‘सकल हिंदू समाज’ गप्प का?
महाराष्ट्रासह देशभरात ‘सकल हिंदू समाज’ या नावाने अधूनमधून काढले जाणारे मोर्चे, सभा आणि आंदोलनांचा संदर्भ देत अग्रलेखात थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. “हिंदूंच्या नावाने कुठेही छोटीशी घटना घडली, तरी हा समाज ‘हिंदुत्वाचा अपमान झाला’ अशी बोंब मारत रस्त्यावर उतरतो. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, आणि ‘गोहत्या’ या विषयांवरून तणाव निर्माण करणे हा ज्यांचा छंद आहे, ते आता अयोध्येच्या राममंदिरातील दानपात्र आणि चांदीची सरळ ‘लूट’ झाल्यावर शांत का बसले आहेत?” असा रोकडा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटले असल्यामुळेच या समाजाने स्वतःचे तोंड आणि डोळे बंद केले आहेत का, अशी चपराकही लगावण्यात आली आहे.
आरोपींच्या नावांवरून सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला
या चोरी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने टिन्नू यादव आणि अनुकल्प मिश्रा नामक काही लोकांना अटक केली आहे. या अटकेचा दाखला देत अग्रलेखात उपरोधिकपणे म्हटले आहे की, “आता हे टिन्नू, मिश्रा वगैरे लोक हिंदू नसून मुसलमान आहेत आणि त्यांनी हिंदूंची खोटी नावे धारण करून मंदिरांची लूट केली, अशी अफवा तरी कोणीतरी पसरवून राममंदिर बचाव लढाईला तोंड फोडले पाहिजे. कारण जोपर्यंत राममंदिर लुटीत किंवा कोणत्याही घोटाळ्यात एखादे मुसलमान नाव समोर येत नाही, तोपर्यंत फडणवीस, मिंधे (एकनाथ शिंदे), मोदी, शहा आणि त्यांनी निर्माण केलेला ‘सकल हिंदू समाज’ हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवणार नाही.” राममंदिर हा भारतीय जनतेचा आत्मा असतानाही, ही लूट राजकीय फायद्याची नसल्यानेच यावर कोणी बोलत नाही, अशी टीका यात करण्यात आली आहे.
‘नीट’ पेपरफुटीचा दाखला देत भाजपवर निशाणा
हिंदू समाज केवळ धार्मिक वादांमुळेच धोक्यात येतो का, असा प्रश्न विचारत सामना अग्रलेखात देशातील गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या महाघोटाळ्याचा सविस्तर संदर्भ देण्यात आला आहे. महाराष्ट्र हे या पेपरफुटीचे मुख्य केंद्र बनले असून यात पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे, तेजस शाह, मनीषा हवालदार, शिवराज लोखंडे, शुभम खैरनार आणि लातूरचे कोचिंग क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना अटक झाली आहे. हे सर्व पकडले गेलेले लोक ‘हिंदू’ आहेत आणि प्रखर हिंदुत्ववादी भाजपशी संबंधित आहेत, असा दावा शिवसेनेने केला आहे.
अग्रलेखातील थेट प्रहार: “या गुन्हेगारांनी पैशांसाठी लाखो हिंदू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले, त्यांचे कोट्यवधी रुपये लुटले आणि हिंदू मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. तरीही ‘सकल हिंदू समाज’ किंवा भाजपचे नेते यावर पूर्णपणे गप्प आहेत; कारण गुन्हा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच ‘हिंदू पाठीराखे’ आहेत.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 27-06-2026














