MPSC Clerk Bharti: ‘एमपीएससी’कडून गट-क परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; मात्र ‘ऑनलाइन’ परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांचा समावेश; निर्णय रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा नितीन आंधळे यांचा इशारा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यभरातील बेरोजगार तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. आयोगाने विविध विभागांमधील एकूण २ हजार ६१९ रिक्त पदांसाठी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भव्य (MPSC Clerk Bharti) प्रक्रियेअंतर्गत लिपिक-टंकलेखक (१,८६४ जागा), सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (४६१ जागा), कर सहाय्यक (२८२ जागा), उद्योग निरीक्षक (९ जागा) आणि तांत्रिक सहाय्यक (३ जागा) अशी महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी २७ जून ते १७ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे.

MPSC कडे पदे वर्ग केल्याचे स्वागत, पण ऑनलाइनला विरोध

शासनाने ही सर्व पदे एमपीएससीकडे वर्ग केल्याच्या निर्णयाचे स्पर्धा परीक्षार्थींनी मनापासून स्वागत केले आहे. मात्र, याच वेळी आयोगाने ही परीक्षा ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला विद्यार्थी वर्गातून अत्यंत तीव्र विरोध दर्शवला जात आहे. राज्यात यापूर्वी जिथे जिथे खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, तिथे तिथे पेपरफुटी, डमी उमेदवार आणि तांत्रिक फेरफारचे मोठे घोटाळे समोर आले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या पारंपरिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह परंपरेला डावलून हा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.

‘नॉर्मलायझेशन’ पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

टीसीएस आणि आयबीपीएस (TCS/IBPS) पॅटर्नमध्ये वापरली जाणारी ‘नॉर्मलायझेशन’ (गुण समानीकरण) प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक आणि संशयास्पद असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणाऱ्या पेपरच्या कठीण पातळीचे कारण पुढे करून, वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचे हक्काचे गुण या पद्धतीमुळे कमी केले जातात. ही क्लिष्ट पद्धत विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी एमपीएससीने गट-क ची इतकी मोठी परीक्षा ‘ऑफलाइन’ (ओएमआर शीट) पद्धतीने अत्यंत यशस्वी, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडली असताना, अचानक यावर्षी ऑनलाईन परीक्षेचा घाट कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे, अशी विचारणा आता होत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण

ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर दूर असणारी शहरी परीक्षा केंद्रे दिली जातात. यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास, निवास आणि वाढीव शुल्काचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यातच ऐन परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाऊन होणे किंवा अचानक संगणक बंद पडणे अशा तांत्रिक अडचणी उद्भवतात. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर मानसिक खच्चीकरण होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो.

विद्यार्थी संघटनेचा थेट इशारा: “शासनाने आणि आयोगाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. हा ऑनलाईन परीक्षेचा अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. आगामी सर्व भरती परीक्षा केवळ आणि केवळ एमपीएससीमार्फत जुन्या ‘ऑफलाइन’ पद्धतीनेच घेण्यात याव्यात. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.” — नितीन आंधळे (स्पर्धा परीक्षार्थी तथा विद्यार्थी संघटना प्रतिनिधी)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 27-06-2026