‘बाली’ ट्रिपवेळी कचऱ्यात फेकला होता पासपोर्ट; ४,४०० कॉल्स करून रचला कट
पुणे: Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अगरवाल हत्या प्रकरणाला (Pune Crime Branch) दररोज नवे आणि अत्यंत धक्कादायक वळण मिळत आहे. मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली देताना तपासाला चक्रावून टाकणारे खुलासे केले आहेत. “मला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, पण हे घरात सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. घरच्यांचा सामना करून लग्न मोडण्यापेक्षा केतनचा काटा काढणे मला जास्त सोपे वाटले,” अशी धक्कादायक कबुली सियाने पुणे ग्रामीण पोलिसांना दिली आहे.
“विग लावणे” ठरले हत्येचे अजब कारण?
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सियाने खुनाचे एक अजब कारण पुढे केले आहे. केतन हा डोक्याला विग लावत असल्याने ती त्याचा तिरस्कार करत होती, असा दावा तिने केला. घरच्यांना न दुखावता या लग्नातून सुटका करून घेण्यासाठीच लोहगड किल्ल्यावरून त्याला दरीत ढकलून अपघाताचा बनाव रचल्याचे तिने सांगितले. मात्र, या दाव्यावर केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझा मुलगा छोटा हेअर पॅच वापरायचा ही गोष्ट खरी आहे; पण साखरपुड्यापूर्वीच आम्ही सियाच्या कुटुंबाला याची पूर्ण कल्पना दिली होती. केवळ विग लावतो म्हणून मुलाची हत्या केली जाऊ शकत नाही, हा निव्वळ बनाव आहे,” असे वडिलांनी स्पष्ट केले.
क्रिकेट टूर्नामेंट, आर्थिक परिस्थिती आणि १७ कोटींचे लग्न
तपासादरम्यान पोलिसांना सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. जानेवारी महिन्यात एका कम्युनिटी क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान सियाच्या कुटुंबाला या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. मात्र, चेतनची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि अगरवाल कुटुंब अतिशय श्रीमंत असल्याने, सियाच्या घरच्यांनी तिचा विवाह केतनसोबत निश्चित केला होता. उदयपूरमधील एका भव्य महालात हा विवाह सोहळा पार पडणार होता, ज्यासाठी पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड विमानेही बुक करण्यात आली होती.
बाली ट्रिप खोळंबली; पासपोर्ट फेकला कचऱ्यात!
केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने गेल्या काही महिन्यांत तब्बल ४,४०० पेक्षा जास्त फोन कॉल्स करून नियोजन केले होते. यापूर्वीही सियाने केतनला मारण्याचे दोन ते तीन अपयशी प्रयत्न केले होते. केतन आणि सियाचे बाली येथे प्री-वेडिंग शूट होणार होते. मात्र, ठरलेल्या प्लॅननुसार सियाने मुंबई विमानतळावर जाताना वाटेत एका फूड प्लाझावर केतनचा पासपोर्ट चोरून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला, ज्यामुळे ती आंतरराष्ट्रीय ट्रिप रद्द झाली होती.
तिसऱ्या प्रयत्नात लोहगडावर केला घातपात
सियाने केतनला यापूर्वी ३१ मे आणि १४ जून रोजीही लोहगड किल्ल्यावर नेले होते, जेणेकरून त्याला दरीत ढकलण्याची संधी मिळावी. मात्र, तेथे असणारी पर्यटकांची गर्दी आणि इतर कारणांमुळे त्यांचा प्लॅन यशस्वी झाला नाही. अखेर सियाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी तिने केतनला लोहगड किल्ल्यावर येण्यास भाग पाडले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चेतन चौधरी आणि सियाने मिळून एका निर्जन कड्यावर केतनला फोटो काढण्याच्या बहाण्याने नेले आणि ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.
डिलीट चॅट्स रिकव्हर; भावाचीही होणार चौकशी
हत्या केल्यानंतर सियाने अतिशय चलाखीने केतनच्या आणि स्वतःच्या मोबाईलमधील एकमेकांचे चॅट्स आणि मेसेजेस डिलीट केले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने तांत्रिक तपासाच्या आधारे हे डिलीट केलेले मेसेज पूर्णपणे रिकव्हर केले असून, यावरूनच या दोघांमधील संभाषणाचे भक्कम धागेडोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल गोयल याचीही कसून चौकशी केली. सिया आणि चेतनच्या संबंधांबद्दल साहिलला आधीच माहिती होती का? आणि त्याने ही माहिती कुटुंबापासून लपवली होती का? याचा तपास सुरू आहे. सध्या मुख्य दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 27-06-2026














