Maharashtra Rain Updates: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय! पुढील पाच दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी:

राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला असून पुढील पाच दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain Updates) वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाचा प्रभाव वाढणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या कालावधीत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा विस्तार पाहायला मिळणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत पुढील ४ दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

पालघरमध्ये मुसळधार; पाणीटंचाईचे संकट टळणार, शेती कामांना गती

पालघर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिराने आणि संथ गतीने झाले होते. मात्र, कालपासून पावसाने चांगलाच जोर पकडला असून पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागातील पाणीटंचाईचे संकट मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिना संपत असताना झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतांमध्ये आणि शहरांमधील सखल भागांत पाणी साचले आहे. रखडलेल्या भात पेरण्यांना आता वेग आला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप

हिंगोली जिल्ह्यामध्ये या मोसमातील सर्वात मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ शहरासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली-परभणी या मुख्य मार्गावरून पाण्याचे लोंढे वाहात असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना या पाण्यातूनच आपली वाट काढावी लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 02-07-2026