गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ‘वास्तविक अभिनय’ विषयीच्या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद

डॉ. मिलिंद इनामदार यांनी सांगितले सहज सोप्या अभिनयाचे तंत्र

रत्नागिरी :

रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा नेहमीचा मोलाचा वाटा आहे. आजपर्यंत महाविद्यालयातून अनेक दिग्गज कलाकार निर्माण झाले, जे आज मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट तसेच अगदी हॉलिवूडमध्ये देखील कार्यरत असून रत्नागिरीचे नाव मोठे करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या अंर्तभूत कलागुणांना वाव देण्यासाठी २ वर्षांपूर्वी गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय येथे परफॉर्मिंग आर्ट्स ही शाखा सुरू करण्यात आली. ज्यामधून सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांची अंगीभूत कला समृद्ध करतानाच त्यांना त्याविषयीचे परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच उद्देशाने
दिनांक २२ जून ते २७ जून या दरम्यान महाविद्यालयात प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांची वास्तविक अभिनयाविषयीची कार्यशाळा भरविण्यात आली होती. डाॅ. इनामदार हे राष्ट्रीय नाट्यविद्यालय दिल्लीचे माजी विद्यार्थी असून सध्या ते मुंबई विद्यापीठात थिएटर विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. डाॅ. इनामदार यांनी या कार्यशाळेत कुठल्याही प्रकारचा अतिरेक न करता सहज पद्धतीने अभिनय कसा करावा याविषयीच्या टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विचारांची कल्पकता वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या ॲक्टिव्हीटींना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्ननांनाही प्रा. डाॅ. इनामदार यांनी सहज सोप्या भाषेत उत्तरे दिली.

Radhakrushna patapedhi

या कार्यशाळेमुळे सहज अभिनयाचे तंत्र कळतानाच कुठल्याही विषयावर अधिक खोलवर जाऊन विचार केल्यास अनेकविध पैलू कसे सापडतात हे डाॅ. इनामदार यांच्यामुळे कळल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
भविष्यात रत्नागिरीतून अनेक कलाकार घडावेत आणि रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा अधिकाधिक जपला जावा अशा शुभेच्छा डाॅ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर आणि विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उप प्राचार्य डॉ
सीमा कदम ,समन्वयक डॉ. मीनल खांडके,प्रा. हरिश केळकर प्रा.साई जिरोळे, प्रा.आर्या वंडकर प्रा.कश्मीरा सावंत,प्रा. ओंकार रसाळ ,प्रा.रमा रानडे यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 02-07-2026