मंडणगडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस!

रत्नागिरी: रत्नागिरी पावसाळा अपडेट समोर येत असून, संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभरात मान्सूनची संततधार कायम आहे. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड आणि दक्षिण रत्नागिरीच्या भागात पावसाचा जोर तुलनेने प्रचंड अधिक होता.

मागील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६१९.७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याची सरासरी ६८.८६ मिमी एवढी राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात तब्बल १४३.५० मिमी इतका नोंदवला गेला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही अशाच तीव्र पावसाचा इशारा दिला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.

२४ तासांतील तालुकावार पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये)

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विविध तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे कोष्टकात दिली आहे:

तालुकापावसाची नोंद (मिमी मध्ये)
मंडणगड१४३.५०
खेड७३.८५
लांजा७३.६०
दापोली६९.५७
संगमेश्वर६५.४०
चिपळूण५५.६६
राजापूर५५.५०
रत्नागिरी४१.८८
गुहागर४०.८०

अनावश्यक प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पूरग्रस्त भाग, नदी-नाले आणि धरणांच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. “रत्नागिरी जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाचे सातत्याने बारीक लक्ष असून प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे,” असे आश्वासन प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 04-07-2026