Maharashtra School Closure updates: ९ जुलै रोजी राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नाही; शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश

सरकारची कडक भूमिका; आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई: Maharashtra School Closure म्हणजेच ९ जुलै २०२६ रोजी विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास किंवा कामावर गैरहजर राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर ‘एका दिवसाची वेतन कपात’ करण्याची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

विविध माध्यमांतील वृत्तानंतर शिक्षण विभाग सतर्क

विविध वृत्तवाहिन्या आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या संदर्भात आवश्यक कडक सूचना जारी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष दक्षता

शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू ठेवणे बंधनकारक आहे. ९ जुलै रोजी कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शाळा स्तरावर अध्यापनाचे काम नेहमीप्रमाणेच सुरू राहिले पाहिजे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या या सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि विद्यार्थ्यांचे अध्यापन नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 09-07-2026