शासकीय कर्मचारी आणि अपात्र महिलांचा लाभ बंद
मुंबई:
महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील खर्चासंदर्भात कॅगने (CAG) ताशेरे ओढल्यानंतर आता अपात्र लाभार्थ्यांवर कडक कारवाईची पावले उचलली जात आहेत. या योजनेत काही पुरुषांनी आणि शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील बेकायदेशीरपणे लाभ मिळवल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या पुरुषांकडून दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
पुरुषांकडून वसुली होणार, शासकीय कर्मचाऱ्यांवर आधीच कारवाई
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे, ज्या पुरुषांनी फसवणूक करून या योजनेचे पैसे लाटले आहेत, त्यांच्याकडून दंडासह संपूर्ण रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे.
तसेच, नियमबाह्य लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया मागील आठ-दहा महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम थेट शासकीय तिजोरीत (ट्रेझरी) जमा केली जाते, ती विभागाकडे परत येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची धक्कादायक आकडेवारी
लाडकी बहीण योजनेतील प्रत्यक्ष आणि कायदेशीर पात्र लाभार्थ्यांची संख्या सध्या १ कोटी ६७ लाखांच्या दरम्यान आहे. मात्र, छाननी आणि पडताळणीदरम्यान लाखो अपात्र लाभार्थी समोर आले आहेत, ज्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
- ई-केवायसी न केलेल्या महिला: शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या तब्बल ६२ लाख महिलांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.
- उत्पन्नाची अट (वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त): कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असतानाही अर्ज करणाऱ्या १६ लाख लाभार्थ्यांचा लाभ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
- शासकीय नोकरी: कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत असूनही लाभ घेणारे ४.४२ लाख लाभार्थी चौकशीत अपात्र ठरले आहेत.
- संजय गांधी निराधार योजना: आधीच संजय गांधी निराधार योजनेचा महिना १५०० रुपयांचा लाभ घेत असूनही लाडकी बहीण योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या ३.६ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
- एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभ: शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच कुटुंबातून दोनपेक्षा जास्त संख्या असलेल्या २.५ लाख महिलांचा लाभ देखील रद्द करण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक गरजू आणि खऱ्या पात्र भगिनीलाच या योजनेचा अखंड लाभ मिळावा, यासाठी ही कठोर फिल्टरेशन प्रक्रिया राबवली जात असल्याचे महिला व बालविकास मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 14-07-2026













