‘RTO E-Challan’ फेक फाईल ठरली घातक; आधार ओटीपी (Aadhaar OTP) येताच खात्यातून रक्कम लंपास, ५ संशयित पोलिसांच्या जाळ्यात
राजापूर:
Rajapur Cyber Fraud Case (राजापूर सायबर फसवणूक प्रकरण) अंतर्गत राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला एका मोठ्या हायटेक सायबर गुन्ह्याचा छडा लावण्यात अभूतपूर्व यश आले आहे. राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलवर फेक लिंक पाठवून त्यांची करण्यात आलेली तब्बल ३ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुणे आणि जुन्नर परिसरातील ५ संशयित आरोपींवर कडक कारवाई करत ॲड. खलिफे यांची गेलेली ३ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम यशस्वीरीत्या परत मिळवून दिली आहे.
‘RTO E-Challan.apk’ फाईल ठरली फसवणुकीचे माध्यम
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ॲड. जमीर खलिफे यांचे वडील निजामउद्दीन खलिफे हे घरी असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अज्ञात क्रमांकावरून RTO E-Challan.apk नावाची एक फाईल मेसेजद्वारे आली. या मेसेजमध्ये गाडीचा नोंदणी क्रमांक आणि बनावट चलन क्रमांक नमूद करण्यात आला होता.
वाहतूक पोलिसांचे चलन असावे या समजुतीने ॲड. खलिफे यांच्या वडिलांनी ती एपीके (.apk) फाईल आपल्या मुलाच्या मोबाईलवर पाठवली. ॲड. जमीर खलिफे यांनी ती फाईल ओपन करताच, त्यांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी ओटीपी (OTP) मेसेज आला. हा ओटीपी प्रविष्ट झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ॲड. खलिफे यांच्या ‘इंडसइंड बँक’ (IndusInd Bank) शाखा राजापूरच्या सेव्हिंग खात्यातून एकूण ३,००,०००/- रुपये अज्ञात सायबर भामट्याने ऑनलाईन पद्धतीने डेबिट (काढून) केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ॲड. खलिफे यांनी तातडीने केंद्र सरकारच्या सायबर हेल्पलाईन १९३० नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली आणि राजापूर पोलिसांत रीतसर धाव घेतली.
लोन खात्याचा वापर करून पैशांची विल्हेवाट; पुण्यातून ५ जण ताब्यात
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख आणि पथकाला तपासासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. सायबर तपासात असे आढळून आले की, चोरलेली रक्कम पुणे येथील एका फिनकॉर्प कंपनीमार्फत काहींनी घेतलेल्या कर्ज (Loan) खात्यात जमा झाली होती. लोन भरण्यासाठी कमिशन पद्धतीने बँक खाती वापरून हा व्यवहार केला जात होता.
या तपासाच्या आधारे पोलिसांनी खालील ५ संशयित आरोपी शोधून काढले: १. मितेश जालींदर वाघुले (वय ३४, रा. पांडुरंगवाडी महाळुंगे, जुन्नर, पुणे)
२. किरण् मच्छिंद्र नेहरकर (वय २४, रा. येडगाव, जुन्नर, पुणे)
३. विजय काशिनाथ वोऱ्हाडे (वय ४५, रा. चावंड, जुन्नर, पुणे)
४. दत्तात्रय गंगाराम गवारी (वय ४४, रा. आंबे, जुन्नर, पुणे)
५. गंधार संजय रत्नपारखी (वय ३३, रा. नारायणगांव, जुन्नर, पुणे)
यातील मितेश वाघुले आणि किरण नेहरकर यांच्याच लोन खात्यात हे ३ लाख रुपये जमा झाले होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही संपूर्ण रक्कम तत्काळ ॲड. खलिफे यांच्या बँक खात्यात वर्ग (रिफंड) केली आहे.
मुख्य सूत्रधार फरार; पोलिसांचे कौतुक
या संपूर्ण सायबर रॅकेटचा मुख्य संशयित सूत्रधार शादाब अन्सारी (वय ४१, रा. हुंडाई चौक, चाकण तळेगाव रोड, पुणे) हा असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या टोळीने अशाच प्रकारे फेक लिंक पाठवून राज्यातील इतर किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार आणि दीपक काळे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. राजापूर पोलिसांच्या या धडक आणि वेगवान कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 14-07-2026














