दोन दिवसीय सुनावणी प्रक्रियेत ६१ टक्क्यांहून अधिक नागरिकांचा सक्रिय सहभाग; प्रशासकीय निर्णयाकडे लक्ष
बातमी
Devrukh Nagar Panchayat: देवरुख नगरपंचायत हद्दीतील विविध नियोजित कामांच्या संदर्भातील हरकती व सूचनांवरील दोन दिवसीय महत्त्वपूर्ण सुनावणी प्रक्रिया आज यशस्वीपणे पार पडली. आपल्या शहराच्या विकासात आणि निर्णय प्रक्रियेत देवरुखच्या नागरिकांनी जागरूकपणे सहभाग घेत प्रशासनासमोर आपली मते मांडली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत एकूण २१३ हरकतदार व सूचनादारांपैकी १८० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुनावणीत भाग घेतला.
दोन दिवसांच्या या कायदेशीर प्रक्रियेत पहिल्या दिवशी एकूण १५७ हरकतदार/सूचनादार होते, त्यापैकी ९१ नागरिकांनी सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले मुद्दे सप्रमाण मांडले. दुसऱ्या दिवशी एकूण १३६ हरकतदार/सूचनादार होते, त्यापैकी ८९ नागरिक सुनावणीसाठी उपस्थित राहिले. अशा प्रकारे पहिल्या दिवशी ९१ आणि दुसऱ्या दिवशी ८९ अशा एकूण १८० जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे आपल्या हरकतींची नोंद केली.
Devrukh Nagar Panchayat: ६१ टक्क्यांहून अधिक नागरिकांचा सक्रिय सहभाग
दोन दिवसांत मिळून ६१ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी दाखवलेला हा सक्रिय सहभाग देवरूखकरांच्या जागरूकतेची उत्तम साक्ष देत आहे. स्थानिक प्रशासकीय कामकाजात आणि नियोजित प्रकल्पांबाबत नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन मते मांडल्याने लोकशाही प्रक्रियेला बळकटी मिळाली आहे. देवरुखच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी नागरिकांनी दाखवलेली ही तत्परता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आता निर्णयाकडे संपूर्ण देवरुखवासीयांचे लक्ष
प्रशासकीय पातळीवर दोन्ही दिवस चाललेल्या या सुनावणी दरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत अभ्यासपूर्ण होते. आता प्राप्त झालेल्या या सर्व हरकती व सूचनांवर प्रशासन काय निर्णय घेते आणि नागरिकांच्या मागण्यांना कसा न्याय देते, याकडे संपूर्ण देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 17-07-2026














