लांजा एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला असून, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. लांजा-कोर्ले मार्गावर केळंबे तेलीवाडी येथील विभूते स्टॉपजवळ एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, लांजा वैभव वसाहत येथील रहिवासी पारितोष प्रशांत वाघधरे (वय ३६) यांनी या घटनेसंदर्भात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे वडील प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक MH 08 AQ 1890) घेऊन पत्नी पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६०) आणि नातू पार्थ पारितोष वाघधरे यांच्यासह लांजा ते विवली असा प्रवास करत होते.
प्रवास सुरू असताना केळंबे विवली तेलीवाडी येथील विभूते स्टॉपजवळ समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने (क्रमांक MH 08 BT 2667) रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
जखमींवर उपचार आणि पोलिसांचा पुढील तपास
या अपघातात रिक्षाचालक प्रशांत वाघधरे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी वाघधरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचा नातू पार्थ वाघधरे हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य राबवले.
या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थितीचा अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 20-07-2026














