Chiplun : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला

तिवरे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

चिपळूण येथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा विहिरीत मृतदेह आढळल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पालवण येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी तिवरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रियंका गजानन चव्हाण (वय ५२, रा. पालवण ताठलेवाडी, ता. चिपळूण) असे मृत आढळलेल्या ५२ वर्षीय महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रियंका चव्हाण या १५ जुलै २०२६ रोजी पहाटेपासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला आणि याप्रकरणी तिवरे पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची (नोंद क्र. १०/२०२६) तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, १८ जुलै रोजी सकाळी पालवण येथील एका विहिरीत प्रियंका चव्हाण यांचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच तिवरे पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तिवरे पोलिसांकडून पुढील तपास सुरू

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.

या प्रकरणी तिवरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 20-07-2026