भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रमोद जठार यांच्या स्वीय सहाय्यकांना निवेदन सुपूर्द
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेतून बांधण्यात आलेली घरकुले मूळ लाभार्थ्यांच्या नावावर करून ती कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात यावीत, अशी मागणी भाजपा सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रमोद जठार यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
२५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न
तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर नगरपरिषदेने वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचे ठराव केल्यामुळे गेली २५ वर्षे ही घरकुले मूळ लाभार्थ्यांच्या नावावर होऊ शकलेली नाहीत. हा प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
ठरावांमुळे मूळ लाभार्थी वंचित राहण्याची भीती
- नगरपरिषदेचा नवीन ठराव: नगरपरिषदेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी ठराव क्रमांक ११३ अन्वये ही घरकुले सफाई कर्मचाऱ्यांना ‘डॉ. आंबेडकर आवास योजने’तून देण्याचा निर्णय घेतला आहे.
- लाभार्थी वंचित राहण्याचा धोका: या नवीन ठरावामुळे एकात्मिक शहर विकास योजनेतील मूळ लाभार्थी आपल्याला मिळालेल्या हक्काच्या घरकुलापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- पुन्हा एकदा दाद: यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न मांडण्यात आला होता. आता भाजपाच्या ‘सेवा अभियाना’च्या माध्यमातून हा विषय पुन्हा एकदा समोर आणून मूळ निर्णयाची तपासणी करावी आणि लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 22-08-2026














