Rajapur Kelavali Phata Accident: राजापुरात एसटी आणि कारचा भीषण अपघात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर

केळवली फाटा जामदे पुलाजवळील घटना

राजापूर:

तालुक्यातील केळवली फाटा येथील जामदे पुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी चालकाने कारला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. मात्र, कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, देवगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारमधील ३ जण जखमी

या अपघातात पुढील तिघे जण जखमी झाले आहेत:

  • युधीराज भिकाजी राणे (वय ३२)
  • विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५)
  • राज रामदास म्हाळवदे (वय २२)

हे तिघेही शिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी आहेत.

अपघाताचे नेमके कारण आणि पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अमित साटम हे आपल्या कारने (MH 07 BG 9097) मित्रांसह शिरगाव येथून केळवली-पाचल मार्गे अणुस्कुरा घाट रस्त्याने पुण्याच्या दिशेने जात होते. याच दरम्यान वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा-रिंगेवाडी-खारेपाटण एसटी बस (MH 20 BL 3079) केळवली फाट्यावरील वळणावर आली.

एसटी चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांनी वळणाचा अंदाज न घेता बस भरधाव वेगात चालवल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसटी कारला काही अंतर फरफटत घेऊन गेली.

  • आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी: अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. राजापूर आगार प्रमुख काव्या पेडणेकर, वाहतूक नियंत्रक अजय सिडाम तसेच सिंधुदुर्गचे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांनीही अपघातस्थळाची पाहणी केली.
  • नुकसान व गुन्हा दाखल: अपघातात एसटीचे सुमारे ४० हजार तर कारचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूर पोलिसांनी एसटी चालक गणपती जाधव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 22-08-2026