School Mid-Day Meal Quality Check: शालेय पोषण आहारावर ‘अन्न व औषध प्रशासना’ची करडी नजर; वर्षातून दोनदा होणार ऑडिट

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई; ५० मीटर परिसरात जंकफूड विक्रीवर पूर्ण बंदी

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड रोखण्यासाठी वर्षातून दोन वेळा शालेय पोषण आहाराचे अधिकृत ऑडिट केले जाणार आहे. या तपासणीमुळे पोषण आहार व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण राहणार असून, निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

एफएसएसएआय (FSSAI) परवाना बंधनकारक

शाळेत स्वतः भोजन तयार केले जात असो किंवा माध्यान्ह भोजनासाठी नियुक्त केलेले ठेकेदार, संस्था, सेंट्रल किचन आणि महिला बचत गट असोत, या सर्वांकडे ‘भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’चा (FSSAI) वैध परवाना किंवा नोंदणी असणे अत्यंत बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवाना किंवा निकृष्ट अन्न पुरवठा करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई अटळ असेल.

ईट राईट स्कूल उपक्रम आणि नवीन कडक नियम

विद्यार्थ्यांना सुरक्षित, संतुलित आणि आरोग्यदायी आहार मिळावा यासाठी एफएसएसएआयने विशेष नियम लागू केले आहेत:

  • वर्षातून २ वेळा अचानक पाहणी: एफडीए अधिकारी स्वच्छता, पिण्याचे पाणी, कच्च्या मालाची गुणवत्ता, साठवणूक आणि अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेची सखोल तपासणी करतील.
  • जंकफूड विक्रीवर बंदी: शाळेच्या आवारात आणि प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतराच्या क्षेत्रात हाय फॅट, हाय शुगर आणि सॉल्टयुक्त जंकफूडच्या मोफत विक्रीवर, वितरणावर आणि जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • ‘ईट राईट स्कूल’ आराखडा: प्रत्येक शाळेने व्यवस्थापन समितीद्वारे शालेय पोषण धोरण मंजूर करणे, सुरक्षित पिण्याची सोय करणे आणि शैक्षणिक वर्षात अन्नसुरक्षेबाबत किमान ४ जनजागृती सत्रे आयोजित करणे बंधनकारक आहे.
  • त्रिस्तरीय निगराणी: एफडीए सोबतच जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख आणि स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायती नियमित पाहणी करून अनुपालन निश्चित करतील.

हा नियम राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, केंद्रीय बोर्ड (CBSE/ICSE) आणि निवासी शाळा तसेच वसतिगृहांना लागू करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 22-08-2026