Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा लूक पाहून चाहते चिंतेत, प्रकृतीच्या चर्चांवर ‘भाईजान’ची पोस्ट..

काऊबॉय लुकमधील फोटो व्हायरल

Salman Khan Breaks Silence on Health Buzz बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अलिकडेच मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमातील त्याच्या अवतारामुळे त्याच्या प्रकृतीविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अखेर सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत या सर्व चर्चांना आपल्या खास शैलीत पूर्णविराम दिला आहे.

नुकतीच सलमान खानने मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA) आयोजित एका विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने एसआरएच्या नव्या डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचे अधिकृत उद्घाटन केले. या कार्यक्रमात क्रिम रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेल्या सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. नेहमी रुबाबदार आणि स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या ‘भाईजान’ची या व्हिडिओमधील शारीरिक भाषा आणि लूक पाहून तो आजारी आहे की काय, अशी भीती चाहत्यांकडून व्यक्त केली जात होती.

काऊबॉय अंदाजात नवीन लूक; चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेले हटके उत्तर

प्रकृतीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत सलमान खानने आपल्या काऊबॉय (Cowboy) लुकमधील काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याने वेगवेगळ्या हॅट्स घातल्या असून तो अत्यंत फिट, काहीसा बारीक आणि चेहऱ्यावर हलकी दाढी असलेल्या सिरीयस लुकमध्ये दिसत आहे.

फोटो शेअर करताना सलमान खानने अतिशय मिश्कील आणि हटके कॅप्शन दिले आहे. त्याने थेट चाहत्यांनाच उद्देशून लिहीले, “आप लोगों की तबीयत कैसी है?” (तुम्हा लोकांची तब्येत कशी आहे?). त्याची ही पोस्ट क्षणातच इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली असून चाहत्यांकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. एका नेटकऱ्याने, “सर तुम्ही ठीक असाल तर आम्हीही ठीक आहोत,” अशी प्रतिक्रिया दिली, तर अनेकांनी त्याच्या या नव्या काऊबॉय लूकचे मनापासून कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/beingsalmankhan/?utm_source=ig_embed&ig_rid=A1nbuQJcbnZNiLJ0oPS9uOI

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 20-07-2026