खडकावर आदळून दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज
दापोलीत हर्णे बायपास किनाऱ्यावर १८ जुलै रोजी सकाळी सुमारे एक ते दीड वर्षांचा नर डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने स्थानिक पर्यटनात आणि सागरी जीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक तपासणी करून मृत डॉल्फिनची शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
खडकावर आदळून पोटाला व मानेला गंभीर दुखापत
वन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा डॉल्फिन समुद्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत भरकटला असावा. भरकटल्यानंतर किनाऱ्याजवळील खडकावर आदळल्यामुळे त्याच्या पोटाजवळ आणि मानेवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वन विभाग आणि स्थानिकांच्या उपस्थितीत पर्यावरणपूरक विल्हेवाट
वनरक्षक प्रभू साबणे व वनरक्षक विश्वंभर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत मृत डॉल्फिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली गेली. या मोहिमे दरम्यान हर्णे कांदळवन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहद जमादार, कासवमित्र दुर्गेश जाधव, सुरक्षारक्षक नदीम महाडिक, मुजम्मील काझी, ग्रामपंचायत सदस्या सना काझी यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:01 21-07-2026














