रत्नागिरी: मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ

१९ ऑक्टोबरला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; बीएलओंना ८ ऑगस्टपर्यंत गृहभेटींचे आदेश

रत्नागिरीत मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोकण, मुंबईसह राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे या पुनरीक्षण कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीवरून भारत निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

३० जून ते ८ ऑगस्टदरम्यान बीएलओंमार्फत गृहभेटी

भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या निर्देशानुसार ३० जून २०२६ पासून जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदारांच्या घरोघरी जाऊन ‘गणना प्रपत्र’ वाटप व संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे आता बीएलओंमार्फत गृहभेटींचा कालावधी ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि पुनर्रचनेचे कामही पूर्ण केले जाणार आहे.

1

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी

१७ ऑगस्ट २०२६

सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

2

दावे व हरकती दाखल करणे

१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपले दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळेल.

3

हरकतींचा निपटारा

१७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६

दाखल झालेले सर्व दावे व हरकती निकाली काढणे आणि नोटीस कालावधी पूर्ण केला जाईल.

4

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

१९ ऑक्टोबर २०२६

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

प्रशासनाचे मतदारांना सहकार्याचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे जिल्ह्यातील मतदारांना आपले गणना प्रपत्र भरून देण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले ‘गणना प्रपत्र’ वेळेत भरून बीएलओकडे जमा करावे आणि ही विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:23 21-07-2026