NEET नंतर MHT-CET वरून विरोधक आक्रमक; टक्केवारी अन् पर्सेंटाईलचा फरक स्पष्ट करत आयुक्त दिलीप सरदेसाई यांचे स्पष्टीकरण
मुंबई:
MHT-CET Exam Scam Allegations बाबत राज्यात एक मोठी बातमी समोर येत आहे. NEET पेपरफुटीच्या तीव्र आंदोलनानंतर आता महाराष्ट्रात MHT-CET परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवर शेअर करत MHT-CET 2026 च्या निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता राज्य CET सेलने मौन सोडत हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
MHT-CET Exam Scam Allegations: पर्सेंटाईल अन् टक्क्यांमधील फरक समजून घेणे गरजेचे
सोशल मीडियावरील दाव्यांवर स्पष्टीकरण देताना CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, सीईटी परीक्षेबाबत केले जात असलेले आरोप हे निव्वळ गैरसमजातून आणि तथ्याहीन आहेत.
त्यांनी पर्सेंटाईल पद्धती स्पष्ट करताना पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
- तुलना करणे अयोग्य: एका परीक्षेतील (उदा. १२ वी बोर्ड) कामगिरीची तुलना दुसऱ्या (उदा. CET) परीक्षेशी करणे चुकीचे आहे. अनेक विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटी परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करतात.
- पर्सेंटाईल म्हणजे टक्के नव्हे: पर्सेंटाईल (Percentile) आणि टक्केवारी (Percentage) या पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत. पर्सेंटाईल हे विशिष्ट बॅचमधील विद्यार्थ्यांच्या सापेक्ष कामगिरीवर ठरते.
- टॉपरचा निकष: एखाद्या बॅचमधील टॉपरला १०० पर्सेंटाईल दिले जातात. मग त्याचा प्रत्यक्ष रॉ स्कोअर (Raw Score) ७०, ८० किंवा ९० टक्के काहीही असू शकतो. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळाले असा होत नाही.
आझाद मैदान पोलिसांत तक्रार; सायबर विभागाकडे चौकशीची मागणी
MHT-CET परीक्षेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असा पुनरुच्चार करत आयुक्त सरदेसाई यांनी सोशल मीडियावर पसरवले जाणारे दावे विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
या दिशाभूल करणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात CET सेलच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी सायबर पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
अंतर्गत विश्लेषणानंतर पुढील निर्णय
काही घटकांकडून आलेल्या आक्षेपांची गंभीर दखल घेण्यात आली असून, याबाबतचे अंतर्गत तांत्रिक विश्लेषण (Internal Analysis) केले जात आहे. या सखोल विश्लेषणाचे निष्कर्ष आल्यानंतरच सीईटी सेल पुढील अधिकृत निर्णय जाहीर करेल, असेही आयुक्त सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 28-07-2026














