ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्यावर तोडगा म्हणून बोगदा उभारण्याचा प्रस्ताव
Sunil Tatkare Nitin Gadkari Meeting: मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि कोकणातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान खासदार तटकरे यांनी कोकणवासीयांच्या प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन नितीन गडकरी यांना सुपूर्द करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था आणि अर्धवट कामांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याकडे खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. महामार्गावर अजूनही अनेक ठिकाणी खड्डे असून काम अपूर्ण आहे, तरीही खारपाडा टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय प्रवाशांवर अन्यायकारक असून संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी ठाम मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.
याशिवाय, रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ताम्हिणी घाटातील वाहतूक समस्येवरही भेटीत सविस्तर चर्चा झाली. दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटात होणारे भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या दुर्घटना आणि तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी घाटात पर्यायी बोगदा (Tunnel) उभारण्यात यावा, असा प्रस्ताव खासदार तटकरे यांनी नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला.
कोकणातील नागरिकांचा आणि गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे तटकरे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत योग्य त्या कायदेशीर व प्रशासकीय कारवाईचे आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:10 28-07-2026














