Vishwas Nangre Patil on Gen-Z: जेन-झी पिढीचा ‘केमिकल लोचा’ झालाय; जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटलांचे विधान

वाढत्या स्क्रीन टाइममुळे विचार क्षमतेवर परिणाम; भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात मांडले मत

Vishwas Nangre Patil on Gen-Z: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीच्या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाने देशभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याने तरुण पिढीच्या ताकदीचे कौतुक होत असतानाच, वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी मात्र या पिढीबाबत अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. सततच्या मोबाईल वापरामुळे आजच्या तरुणांच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ झाला असून त्यांची विचार करण्याची आणि भावनिक क्षमता प्रभावित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी नव्या पिढीच्या सवयींवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “आजच्या तरुणांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढला आहे. सतत मोबाईल स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची, विचार करण्याची आणि भावनिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्याची ताकद कमी होत चालली आहे.”

आपल्या भाषणात त्यांनी ‘जेन-झी’ हीच देशाचे खरे भविष्य असल्याचे मान्य केले, मात्र आजच्या काळात या पिढीला काही सांगणे किंवा मार्गदर्शन करणे अत्यंत कठीण झाले असल्याचे स्पष्ट केले. बौद्धिक आणि सामाजिक विकासासोबतच कठीण आव्हानांचा सामना करण्याची ताकद प्रत्येकामध्ये विकसित होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

पोलीस दल आणि सीमेवरील जवानांच्या अविरत सेवेचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या मनातील खंतही व्यक्त केली. “पोलीस कितीही समर्पित वृत्तीने काम करत असले, तरी त्यांच्या वाट्याला टीका आणि शिव्याच येतात. गेल्या काही दिवसांपासून तर मी स्वतःच अधिक शिव्या खातोय,” असे भावूक विधानही विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रसंगी केले. जंतर-मंतर आंदोलनाच्या राजकीय आणि सामाजिक पडसादानंतर नांगरे पाटलांच्या या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 28-07-2026